करोनाशी लढाई नक्की जिंकू : उपमुख्यमंत्री पवार

आढावा बैठकीत आरोग्य यंत्रणेस केल्या सूचना

पुणे – करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करणे, मृत्यू दर कमी ठेवणे, चाचण्यांची संख्या वाढवून रुग्णांवर वेळीच उपचार करणे तसेच इतर आजार असणाऱ्या व्यक्तींना वेळीच ओळखून त्यांच्यावर उपचार आणि विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला केल्या. दरम्यान, गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरेल. करोनाच्या संकटाशी आपण सर्व मिळून विविध माध्यमातून लढत आहोत. आपण ही लढाई नक्की जिंकू, असा विश्‍वासही पवार यांनी व्यक्त केला.

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील करोनाबाबतच्या उपाययोजनाबाबत आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी पवार बोलत होते. ते म्हणाले की, पुणे व पिंपरी चिंचवड शहरात करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे, ही समाधानाची बाब आहे.

मात्र, करोना संसर्ग रोखण्यासोबतच्या उपाययोजनाबरोबरच करोनाबाधित रुग्णाला वेळेवर उपचार मिळतील याबाबत दक्षता घ्यावी. तसेच करोना विषाणूची भीती घालविण्यासाठी तसेच याविषयी जनसामान्यांमध्ये सतर्कता व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती होण्यासाठी छोट्या-छोट्या व्हिडीओच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.

करोना संसर्गातून गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग होत आहे. शासनाने ही सर्वात मोठी सुविधा सुरू केली आहे. प्लाझ्मा दान करण्याबाबत जनजागृती करण्याचे आदेशही पवार यांनी दिले.

या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शंतनू गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे आदी उपस्थित होते.

गणेश विसर्जन मिरवणुकीला परवानगी नाही
करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी यावर्षी आषाढी वारी, बकरी ईद, दहीहंडी असे सर्व सण-समारंभ मर्यादित उपस्थितीत साजरे करण्यात आले. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यावर्षीचा गणेशोत्सव देखील साधेपणाने साजरा करण्यात यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. गणेश विसर्जन घरगुती स्वरूपात करायला हवे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा विसर्जन मिरवणुकीला परवानगी देणार नसल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक गणेश मंडळांना विश्‍वासात घेऊन जनजागृती करावी, असे आवाहनही पवार यांनी केले आहे. तर, याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले की, मिरवणुकीसाठी परवानगी देण्यात येणार नाही. प्रत्येक नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, असेही राव यांनी सांगितले.

“रॅपीड ऍन्टिजेन किट’ ग्रामीण भागासाठीही घ्या
ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग वाढत आहे. बाधितांचे वेळेत निदान झाले तर हा संसर्ग कमी होण्यास मदत होईल. यासाठी रॅपीड ऍन्टिजेन किट घेण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 50 हजार ऍन्टिजेन किट घेण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्‍यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. करोना विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमवेत शुक्रवारी (दि. 14) उपमुख्यमंत्री पवार यांची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी सदर आदेश दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.