अकोले -लॉकडाऊनच्या काळात राहीबाई पोपेरे यांची कोंभाळणे स्थित बीज बॅंक बंद ठेवण्यात आली होती. मात्र लॉकडाऊन काही अंशी शिथिल केल्यावर बीज बॅंक पाहण्यासाठी गर्दी होत आहे. त्यामुळे पोपेरे यांनी परिस्थिती पूर्वपदावर आल्यावरच बीज बॅंक पाहण्यासाठी यावे, असे आवाहन केले आहे.
पोपेरे म्हणाल्या, आमच्या घरातही वृद्ध लोक आहेत. त्यामुळे येणाऱ्या लोकांनी कुठलीही खबरदारी व सुरक्षिततेचे नियम न पाळता मोठी गर्दी करणे म्हणजे या सगळ्यांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. बहुतेक भेट देणाऱ्या व्यक्ती सुरक्षिततेची कुठली काळजी न घेता थेट बीज बॅंकेत फेरफटका मारून जातात. बीज बॅंकेतील जतन केलेल्या व प्रदर्शनात मांडलेल्या बियाण्यांना काचेच्या बरण्यांना हात लावून शंकेला वाव निर्माण करतात. विरोध केल्यास आम्ही काही परत येणार नाही. दूरवरून आलोय, अशी उत्तरे ऐकायला मिळतात.
दरम्यान, खरीप हंगाम जवळ आल्यामुळे बियाणे संच तयार करण्याचे काम सुरू आहे. आपणही या कामात व्यस्त आहोत. कुटुंबातील इतर सदस्यही मदतीचा हात देत आहेत. मात्र या गर्दीमुळे या कामास खीळ बसत आहे. शिवाय करोनाच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे लोकांनी केलेल्या गर्दीमुळे ग्रामस्थही चिंतेत आहेत.
त्यामुळे पोपेरे यांनी बायफचे विभागीय अधिकारी जितीन साठे यांच्याशी संपर्क साधून जनतेला आवाहन केले आहे की, लॉकडाऊननंतर सर्व सुरक्षिततेचे नियम पाळून बीज बॅंक सुरू केली जाईल. तशी माहिती सर्वांना कळवली जाईल. सर्व शेतकरी बांधवांना बियाणे पुरवण्याचा कसोशीने प्रयत्न केला जाईल. सुरक्षिततेची सर्व तयारी व बियाणे पॅक झाल्यावर तसे जाहीर केले जाईल, असे आवाहन पोपेरे यांनी केले आहे.