उमेदवारीचे पाहू, आधी कामाला लागा!

पिंपरी महापालिकेच्या कारभारावरही केले भाष्य
राष्ट्रवादीच्या काळातील विकास कामे ताकदीने पोहचविण्याचा सल्ला
शरद पवार यांचे पिंपरी-चिंचवडच्या कार्यकर्त्यांना आदेश ः मुंबईत निवडणूक आढावा बैठक

आयटीच्या मतदारांवरून नाना काटेंवर नाराजी

चिंचवड विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला कमी मते पडल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. कमी मतांबाबत नाना काटे यांना योग्य उत्तर देता आले नाही यामुळे जयंत पाटील यांनी काटे यांना चांगलेच झापले. आयटीतील मतदार हा स्थानिक उमेदवार न पाहता मतदान करतो. ऑनलाइन मतदारनोंदणी करून तो मोदींचा चेहरा बघून मतदान करतो. त्यावर योग्य उपाययोजना करून विधानसभेला चांगली तयारी करण्याच्या सूचना जयंत पाटील यांनी केल्या. हा मतदार आपलासा करण्यासाठी सोसायटी पातळीवर यंत्रणा उभी करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या. 

पिंपरी  – “राष्ट्रवादी कॉंग्रेसने पिंपरी-चिंचवड शहरात विकास कामे केली. परंतु, ती त्या ताकदीने मतदारांपर्यंत पोहचली नाहीत. त्यामुळे गतवेळच्या विधानसभेला आणि आत्ता लोकसभा निवडणुकीत मावळमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. महापालिकेत सुरू असलेला भ्रष्टाचार, आमदारांमध्ये शहराची झालेली वाटणी याविरोधात आवाज उठवा, विधानसभेच्या उमेदवारीचे पाहू ; परंतु, आत्तापासूनच कामाला लागा,’ असे आदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (दि. 15) मुंबईतील बैठकीत इच्छुकांना दिले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. सक्षम उमेदवार शोधण्यासाठी शरद पवार हे दोन दिवसांपासून मुंबईत जिल्हावार बैठका घेवून आढावा घेत आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली. बैठकीत पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ या चारही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. याशिवाय इच्छुकांची चाचपणीदेखील करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीत रणनिती काय असली पाहिजे, कोणती खबरदारी घ्यायला हवी, विजयी होण्यासंदर्भातील गणिते काय असावीत, उमेदवार कोण? यावर साधकबाधक चर्चा झाली.

पिंपरी विधानसभा मतदार संघातून माजी आमदार अण्णा बनसोडे, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ, नगरसेविका सुलोचना धर-शिलवंत, नगरसेवक राजू बनसोडे, चिंचवडमधून ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे, मोरेश्‍वर भोंडवे, भाऊसाहेब भोईर, मयुर कलाटे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, भोसरीतून माजी आमदार विलास लांडे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने या इच्छुकांनी बैठकीला हजेरी लावली. तर मावळमधून बबनराव भेगडे व बापू भेगडे हे इच्छुक उपस्थित होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, पार्थ पवार आदी बैठकीला उपस्थित होते.

“लोकसभेला भोसरीतून चांगली मते मिळाल्याने भोसरी विधानसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच यश मिळाले पाहिजे. यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. मावळ लोकसभेत पराभवाला सामोरे जावे लागले. तेथे आपण कुठे कमी पडलो त्याचा शोध घेऊन चुका दुरुस्त करा,’ अशा सूचना शरद पवार यांनी केल्या. “महापालिकेची दोन मतदार संघामध्ये वाटणी झाली आहे. कारभाराचा बट्ट्याबोळ सुरू आहे. याविरोधात आवाज उठवा, राष्ट्रवादीच्या काळातील विकास कामे ताकदीने पोहचवा, असा सूचना शरद पवार यांनी केल्या. पक्षाकडे अनेकजण विधानसभेसाठी इच्छूक आहेत. तिन्ही मतदार संघात विजय मिळविण्यासाठी योग्य उमेदवाराची निवडला जाईल. मात्र, आत्तापासून कामाला लागा,’ असेही त्यांनी सांगितले. यावेळी इतर कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)