सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून संकटावर मात करू – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

रूकना नही, चलते रहो : पालकमंत्र्यांची पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्याशी भेट व चर्चा

अमरावती : प्रत्येक दिवस नवे आव्हान घेऊन येत आहे. शासन, प्रशासन, विविध स्वयंसेवी संस्था, अनेक मान्यवर, नागरिक कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी खंबीरपणे झटत आहेत. सर्वांच्या प्रयत्नानेच आपण या संकटावर निश्चित मात करता येईल. रूकना नही, चलते रहो, असे उद्गार श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याशी बोलताना काढले.

कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविताना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर या जिल्ह्यातील विविध मान्यवरांची भेट घेऊन त्यांची मतेही जाणून घेत आहेत. काल त्यांनी ज्येष्ठ नेते व माजी शिक्षक आमदार बी. टी. देशमुख यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे क्रीडा शिक्षण व प्रशिक्षणासह विविध सामाजिक कार्यात मोठे योगदान राहिले आहे. कोरोना संकटकाळातही संस्थेचे खूप सहकार्य मिळत आहे. या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी पद्मश्री वैद्य यांच्या प्रकृतीची विचारपूस करून निरामय आरोग्यासाठी त्यांचे अभिष्टचिंतनही केले.

कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी सुरु असलेले शासकीय प्रयत्न, स्वयंसेवी संस्थांचे पाठबळ, नव्याने करावयाच्या उपाययोजना आदींची माहिती पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी पद्मश्री वैद्य यांना दिली. त्यानुषंगाने शहरातील स्थिती, आवश्यक उपाययोजना आदी विविध बाबींची चर्चा यावेळी झाली.

पद्मश्री वैद्य म्हणाले की, संकटांना घाबरून न जाता विश्वासाने सामोरे जाणे व त्यावर मात करणे हे कुठल्याही कामाच्या यशस्वितेसाठी आवश्यक असते. आजच्या स्थितीत रोज नवे प्रश्न उभे राहत आहेत. या काळात पालकमंत्री श्रीमती ठाकूर या खंबीरपणे विविध आघाड्यांवर लढत आहेत. या काळात सर्वच यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहेत. त्यांचे मनोबलही टिकवून ठेवण्यासाठीही पालकमंत्री काळजी घेत आहेत. त्यांची ही धडाडी व सर्वांची साथ यातून आपण सर्वजण कोरोनाच्या या महासंकटातून निश्चित बाहेर पडू. या काळात नागरिकांनीही मन:शांती, संयम ठेवला पाहिजे. रूकना नही, चलते रहो, असा आशिर्वादही त्यांनी दिला.

संस्थेकडून वंचित, गरजू व हातावर पोट असणाऱ्यांची काळजी घेतली जात आहे. त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शिक्षण ऑनलाईन उपक्रमातून चालू ठेवले आहे. थांबून चालणार नाही, असेही वैद्य यांनी सांगितले.

प्रत्येक दिवस एक आव्हान आहे. रोज नवे आव्हान घेऊन येणाऱ्या या दिवसांवर आम्ही सर्व मिळून निश्चितपणे मात करू. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता क्लस्टरचे उपविभाग करून सूक्ष्म नियोजनातून जोखमीच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले आहेत. डॉक्टर, पारिचारिका, पोलीस, महसूल व इतर यंत्रणा अविरत सेवा देत आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कोरोना चाचणी प्रयोगशाळाही कार्यान्वित होत आहे. त्यासाठी मान्यता व त्यानंतर लॉगिन आयडीही कालच प्राप्त झाला. त्यामुळे आता कोरोना प्रतिबंध उपाययोजनांना गती येईल. सर्वेक्षण व तपासण्यांची कामे व्यापकपणे करता येतील. सर्वांची सहकार्यानेच आपण या संकटावर निश्चित मात करू, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.