नगर – करोना संसर्ग विषाणूच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा आदर्श आपण घेऊन शासनाच्या आदेशाचे पालन करुन करोनाच्या संकटावर मात करून सर्वांचे आरोग्य सदृढ व निरोगी रहावे, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. छत्रपतींचा आदर्श आजच्या युवापिढीने अवलंबवावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.
जिल्हा प्रशासन व महापालिकेच्यावतीने जुन्या बसस्थानक चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. महापौर बाबासाहेब वाकळे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, तहसीलदार उमेश पाटील, नगरसेवक बाळासाहेब पवार, अॅड. शिवाजीराव कराळे, संजीव भोर व शिवभक्त उपस्थित होते.
महापौर वाकळे म्हणाले, ‘‘शहरातील तरुण मंडळांनी करोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी समाजप्रबोधन करावे. निर्बंधांचे पालन करावे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वांना बरोबर घेऊन समाजाच्या उन्नतीसाठी संघर्ष केला. तसेच काम आता सर्वांनी करावे.’’
पोलीस अधीक्षक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पुढील वर्षभर सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे करता येणार नाहीत. हे संकट लवकरच दूर व्हावे आणि आपले उत्सव आपल्याला पुन्हा पारंपरिक पद्धतीने साजरे करता यावेत, यासाठी करोनाला हद्दपार करावे लागेल. त्यासाठी सर्वांनीच निर्बंधांचे पालन करावे, असे ते म्हणाले.