मुंबई – एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेतून बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडून दोन गट निर्माण झाले. त्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटात सातत्यानं कोणत्या ना कोणत्या कारणामुळं संघर्ष टोकाला गेला असल्याचं दिसून येत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार टीका केल्यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील पुन्हा एकदा ठाकरे गटावर अप्रत्यक्ष पणे टीका केली आहे. यावेळी देशपांडे यांनी एक मोठा दावा केल्याचं दिसून आलं.
“तीन दिवसांपूर्वी मी माझ्या शाखेत नसताना एक व्यक्ती आला आणि माझ्या ऑफीसमध्ये काही कागदपत्रं तसंच पेनड्राईव्ह सोडून गेला आहे. करोना काळात विरप्पन गँगने मुंबईकरांना कसं लुटलं याचे पुरावे त्यामध्ये असून, मी सोमवारी हे सर्व पुरावे सादर करणार असल्याचं’, यावेळी संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज सकाळी अकरा वाजता मनसेचे नेते संदीप देशपांडे हे मुंबईतील विद्याधर हॅालमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते स्क्रीन लावून पुराव्यांसहित हा कथित भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचं सांगितलं जात आहे. आता नेमका संदीप देशपांडे यांचा निशाणा कोणावर असणार आहे? या पुराव्यांमध्ये नेमकं काय असणार आहे? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच, या पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे आणखी कोणते खुलासे करणार आहे? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.
भेटूया सकाळी 11वाजता pic.twitter.com/jJGpBr5aU6
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 22, 2023
दरम्यान, आजच्या या पत्रकार परिषदेबाबत संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे. “भेटू सकाळी 11 वाजता…’ असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे. सोबतच एक फोटो शेअर केला आहे. त्यावर “करोनाव्हायरस स्कॅम… विरप्पन गँगचा सर्वात मोठा घोटाळा! मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांची पुराव्यासकट पत्रकार परिषद,” असं लिहिलं आहे.