“विकेल ते पिकेल’ योजनेतून कोकण सुजलाम सुफलाम करुया : मुख्यमंत्री

मुंबई  : शेती ही शाश्वत आहे. करोनाच्या संकटात शेतकऱ्यांनी अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे कामही केले. याचा विचार करून कोकणातील युवकांनी शेतीच्या व्यवसायाकडे वळावे. शासनाने सुरू केलेल्या “विकेल ते पिकेल’ या योजनेच्या माध्यमातून कोकणवासियांनी कोकण सुजलाम सुफलाम करावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मालवण तालुक्‍यातील मसुरे- आंगणेवाडी लघु पाटबंधारे योजना ,मालोंड- मालडी कोल्हापुरी पाटबंधारे योजना आणि कणकवली तालुक्‍यातील कुंभवडे लघु पाटबंधारे योजनेचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. त्यावेळी ते बोलत होते.

करोनाने जगाची आर्थिक गाडी घसरली, पण, या संकटकाळात अर्थचक्राचा डोलारा सांभाळण्याचे काम शेतकऱ्यांनी केले. एक जिल्हा एक उत्पादन आणि त्याला बाजारपेठ मिळावी, मालाचा दर्जा चांगला राहावा, त्याची अधिकाधिक निर्यात व्हावी यासाठी शासनाने विकेल ते पिकेल योजना सुरू केली आहे. संपूर्ण कोकणपट्टा सुंदर आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. कोकणचा विकास मार्गी लावणार. त्यासाठी जे करता येईल ते ते करण्याचे वचन भराडी देवीच्या साक्षीने आपण दिले असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आंगणेवाडीच्या जत्रेत करोना काळात गर्दी करू नका, या केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी भाविकांना धन्यवाद दिले.

कोकणात पाऊस भरपूर पडतो. अनेक ठिकाणी पाऊस पडून गेल्यानंतर उरलेले सगळे वर्ष कोरडे जाते. मग अनेक खलबतं होतात, योजना पुढे येतात. पण आज अरविंद सावंत, विनायक राऊत यांनी या तीन योजना पुढे आणल्या. आज या तीन पाटबंधारे कामांचे आपण भूमिपूजन ऑनलाईन करतो आहोत. कोकणातील लोकप्रतिनिधी जनतेसाठी रुग्णालय आणि इतर गोष्टी मागत असल्याचा मला आनंद असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.