लोणी काळभोर -पूर्व हवेलीत करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन आरोग्य विभागासह सर्व शासकीय यंत्रणा युद्ध पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करीत असून नागरिकांनीही प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ देण्याची गरज आहे. करोनाचा सामना करण्यासाठी सरकारी यंत्रणांना कोणत्याही प्रकारची मदत कमी पडू दिली जाणार नाही, असे आश्वासन खासदार अमोल कोल्हे यांनी दिले.
करोनाबाधित रुग्णांना स्थानिक परिसरातच चांगले उपचार मिळावेत यासाठी लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात बेडची संख्या वाढवावी. कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णाच्या स्वॅब तपासणीसाठी लागणाऱ्या व्हीएमटी किटची संख्या वाढवावी, यासाठी आमदार अशोक पवार यांच्यासमवेत जिल्हा अधिकारी नवलकिशोर राम यांची भेट घेणार आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी उरुळी कांचन येथे विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
यावेळी आमदार अशोक पवार, हवेली पंचायत समितीचे उपसभापती युगंधर काळभोर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार सुनील कोळी, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तालुका आरोग्य आधिकारी सचिन खरात, पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांसह अनेक अधिकारी उपस्थित होते.
खासदार कोल्हे म्हणाले, पूर्व हवेलीला पुढील दोन दिवसांत अतिरिक्त टेस्टिंग किट उपलब्ध होणार आहेत, यामुळे रुग्ण तपासणीचा वेग वाढणार आहे. सध्या करोनाच्या रुग्णांसाठी लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात वीस शासकीय बेड उपलब्ध आहेत. त्याची संख्या 120वर नेण्यासाठी जिल्हा अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याबरोबर चर्चा झाली आहे.
करोनाच्या नियंत्रणाची जबाबदारी फक्त शासनाची नसून, नागरिकांनी शासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. करोनाला रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाबरोबरच, पूर्व हवेलीमधील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम उत्तमरितीने सुरू आहे. लोणी काळभोर येथील करोना केअर सेंटरमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात अतिरिक्त वैद्यकीय आधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
-ऍड. अशोक पवार, आमदार शिरूर-हवेली