मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना धमकी देण्यात आल्याचाधक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हॉट्सअप मेसेज पाठवून मिलिंद नार्वेकर यांना धमकी देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या या धमकीमुळे खळबळ उडाली आहे.
मिलिंद नार्वेकर यांनी याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून यासंबंधी तपास केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद नार्वेकर यांना एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअप मेसेज पाठवत आपल्या काही मागण्या पूर्ण करण्यास सांगितलं आहे. आपल्या मागण्या पूर्ण न केल्यास ईडी, एनआयए आणि सीबीआयची चौकशी करायला लावू अशी धमकी या व्यक्तीने मेसेजमध्ये दिली आहे.
दरम्यान या मागण्यांसंबधी कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र थेट मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांनाच अशा पद्धतीने धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मिलिंद नार्वेकर यांनी याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार केली आहे. दरम्यान मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा याप्रकरणी तपास करणार आहे.