भाजपरूपी रावणाचा पराभव करूया

मोहन जोशी यांची टीका ः घोरपडी बाजार ते वानवडी परिसरात पदयात्रा

“राज्यघटनेची मोडतोड होऊ देणार नाही’

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेची मोदी सरकारकडून मोडतोड करण्याचा प्रयत्न सुरू असून, ती आम्ही कदापि होऊ देणार नाही, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी शनिवारी व्यक्‍त केले. यावेळी राहुल डंबाळे, दत्ता पोळ, सुजित यादव, दीपक ओव्हाळ, संजय खडसे, प्रकाश आरणे, रमेश सोनकांबळे उपस्थित होते. लोकशाही व्यवस्थेवरच मोदी सरकार घाला घालत असून सी.बी.आयचे मुख्य संचालक, रिझवव्ह बॅंकेचे गव्हर्नर मनमानी पद्धतीने बदलणे, न्यायव्यवस्थेत ढवळाढवळ करणे, वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी करणे आणि मुख्य म्हणजे संसदेला कमी लेखणे यातून देशाच्या लोकशाही व्यवस्थेला संपवून मोदी-अमित शहाची हुकुमशाही आणण्याचाच त्यांचा प्रयत्न आहे. तो आम्ही कधीही यशस्वी होऊन देणार नाही, असे बागवे म्हणाले.

पुणे – श्री रामाच्या पराक्रमाचे स्मरण करून भाजपरूपी रावणाचा पराभव करूया, असे प्रतिपादन आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी शनिवारी केले. मोदी सरकारच्या एकाधिकार शाहीचा सर्वाधिक त्रास गोरगरीब जनतेला सहन करावा लागला आणि लागत आहे. या सर्वांना त्रासातून मुक्‍त करण्यासाठीच या रावणाचा पराभव करण्यासाठी आपण सिद्ध झालो आहोत, असे जोशी म्हणाले.

जालियनवाला बाग हत्याकांडाला शनिवारी शंभर वर्षे पूर्ण झाली. त्याबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वेगवेगळ्या निर्णयातून देशातील समाजात, जातीत तेढ निर्माण करण्याचे काम भाजपने केले, अशी टीकाही जोशी यांनी केली.
या संवादयात्रेत कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे ज्येष्ठ नगरसेवक विनोद मथुरावाला, माजी महापौर प्रशांत जगताप, नगरसेवक बंडू गायकवाड, माजी नगरसेविका सुरेखा कवडे आदी सहभागी झाले होते. घोरपडी बाजारातील अय्यप्पा स्वामींच्या दर्शनाने सुरू झालेल्या संवादयात्रेची वानवडी बाजारात सांगता झाली.

“पुण्याचा चौकीदार झोपलेलाच’
पुण्याच्या वाट्याला येऊ घातलेले अनेक महत्त्वाचे विकास प्रकल्प केवळ पुण्याला कोणी वाली नाही म्हणून बाहेर गेले आहेत. पुण्याचा “चौकीदार’ झोपल्यामुळेच शहराच्या विकासाची अशी दुर्दशा झाली आहे, अशी टीका जोशी यांनी केली. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील पदयात्रेदरम्यान ते बोलत होते. पुण्यात व्यवस्थापनशास्त्राची “आयआयएम’ आणि “आयआयटी’ या संस्था येणार होत्या. तसेच, विधी विद्यापीठही होणार होते. परंतु, हे प्रकल्प बाहेर गेले.

उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात होणे अपेक्षित होते. तसेच एम्सच्या धर्तीवर मोठा प्रकल्प अपेक्षित होता. परंतु, गेल्या पाच वर्षांत “चौकीदार’ झोपल्यामुळे पुण्यात हे प्रकल्प मार्गी लागू शकले नाहीत, अशी टीकाही जोशी यांनी केली.
पुण्याच्या नदी सुधारणेसाठी “जायका प्रकल्प’ मंजूर झाल्याची बाब भाजपचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडून आम्ही ऐकली. परंतु आज पाच वर्षे झाली तरी तो मार्गी लागू शकला नाही. किंबहुना तो पुण्याच्या हातून निसटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

अशा झोपी गेलेल्या चौकीदाराच्या हातात पुण्याला सोपवणे नुकसानकारक ठरणार आहे. याची जाण पुणेकरांना आहे. त्यामुळे या चौकीदाराची गच्छंती आता अटळ आहे, असेही जोशी म्हणाले. कॉंग्रेसने गरीब जनतेसाठी अन्न सुरक्षा कायदा केला. त्या माध्यमातून अत्यंत अल्प किमतीत गहू, तांदूळ, तुरडाळ रेशनवर उपलब्ध करून दिले. मात्र, मोदी सरकारने या गरिबांच्या हक्‍कावर गदा आणत गरिबांच्या तोंडचा घास पळवला आहे. त्यामुळे मागच्या वेळी केलेली चूक पुन्हा न करता या सरकारला सत्तेवरून घालवण्याची वेळ आता आली आहे, असे जोशी यांनी नमूद केले.

राहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात गरिबांना वार्षिक 72,000 रुपये उत्पन्नाची हमी देणारी “न्याय’ योजना घोषित केली आहे. त्या माध्यमातून देशातील गरिबी दूर होईल, असा विश्‍वास जोशी यांनी व्यक्त केला. प्रचार फेरीमध्ये शिवा मंत्री, उमेश कंधारे, राजाभाऊ साठे, प्रशांत वेलणकर, किशोर मारणे, किशोर कांबळे स्वप्नील दुधाने, विजय खळदकर आदी सहभागी झाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.