कार्यशाळेत विभागांचा आढावा
जुन्नर (वार्ताहर) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमीमध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करून संपूर्ण देशाला दाखवून देऊया असे आवाहन आमदार अतुल बेनके यांनी केले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजित कार्यशाळेत विविध शासकीय विभागांचा आढावा आमदार बेनके यांनी घेतला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ध्वज विक्री केंद्राचे उदघाटन करण्यात आले. नागरिकांना 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ध्वज लावता येणार असून शासकीय कार्यालय, आस्थापना यांना मात्र ध्वजसंहिता चे पालन करावे लागणार आहे असे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी सांगितले.
जुन्नर नगरपालिकेच्या माध्यमातून चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, विविध उपक्रम राबविणार असल्याचे मुख्याधिकारी मनोज पष्टे यांनी सांगितले. वनविभाग गडकिल्ल्यावर तसेच बिबट निवारण केंद्र येथे ध्वजारोहण करणार असून सर्व पर्यटन स्थळावर स्वच्छता मोहीम राबविन्यात येणार असल्याचे वन परीक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी सांगितले. तालुक्यातील 618 सहकारी संस्थांवर झेंडा फडकावला जाणार असून विविध शासकीय विभागांच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
यावेळी पविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, सहायक गटविकास अधिकारी हेमंत गरीबे, पोलीस निरीक्षक विकास जाधव, कृषी अधिकारी निलेश बुधवंत, बापूसाहेब रोकडे, विस्तार अधिकारी जयश्री बेनके, बालविकास प्रकल्प अधिकारी निर्मला कुचिक उपस्थित होते.