आज गुढीपाडवा : हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे सज्ज
पुणे – चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा सण यंदा मंगळवारी (13 एप्रिल) रोजी साजरा होत आहे. करोनाच्या संकटाचे नैराश्येचे मळभ असले, तरी नागरिक हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. करोनाचे संकट हटवण्यासाठी सर्वांनी उत्तम आरोग्याचा संकल्प करण्याची गरज यानिमित्ताने निर्माण झाली आहे.
यंदा गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला नागरिकांनी साखरेच्या गाठी, आंब्याची पाने, कडूनिंबाचा पाला, गुढीसाठी काठी, वस्त्र आदींची खरेदी केली. तर अनेकांनी ऑनलाइन बाजारपेठांचा पर्याय निवडला. तर काहींनी घरीच साखरेच्या गाठी तयार करण्याला प्राधान्य दिले.
साडेतीन मुहूर्ताचा औचित्य साधून नवीन वस्तूची खरेदी अनेक जण हौसेने करतात. फ्रीज, टीव्ही, मायकोव्हेव्ह आदी घरगुती गोष्टी घेण्यासह नवीन गाडी, घर खरेदीकडेही नागरिकांचा कल असतो. यावर्षी मात्र नागरिकांच्या हौसेवर पाणी फिरले आहे.
अशी उभारा गुढी
गुढीपाडवा हा युगारंभ आहे. मंगळवारी 6.24 वाजता सूर्योदय होणार आहे. सकाळच्या पहिल्या प्रहरात ब्रह्मध्वज पूजन करावे म्हणजेच गुढी उभारावी. सकाळी देवपूजा करून, घरातील ज्येष्ठांना नमस्कार करावा. ब्रह्मध्वज म्हणून उंच काठी, रेशमी वस्त्र, कडूनिंब, साखरेच्या गाठी बांधून, आकाशाच्या दिशेने गुढी उभारावी. साडेतीनपैकी गुढीपाडवा हा पहिला मुहूर्त आहे.
सोने, घर, कापडसह विविध नव्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी हा उत्तम दिवस आहे. 14 विद्या आणि 64 कलांपैकी ज्या कलेवर किंवा विद्येवर प्रभुत्व मिळवायचे आहे, त्याबाबतचा संकल्प करावा. सरस्वती पूजन करावे आणि कला शिकण्यास सुरुवात करावी, अशी माहिती पंडित वसंतराव गाडगीळ यांनी दिली.