मेडिकल कॉलेजच्या पदनिर्मितीला मान्यता द्यावी

शिवेंद्रसिंहराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; महाराष्ट्र स्कूटर्सचा प्लान्ट सुरू करा

सातारा  –
साताऱ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज) जिल्हा रुग्णालयातील महिला रुग्णालय विभागाच्या इमारतीत सुरू करावे आणि त्यासाठीची पदनिर्मिती व पदनिश्‍चिती तातडीने करावी, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्याचबरोबर साताऱ्यातील महाराष्ट्र स्कूटर्सचा प्लान्ट तातडीने सुरू करून सातारा औद्योगिक वसाहतीला ऊर्जितावस्था प्राप्त करून द्यावी, अशीही मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

मुख्यमंत्री ना. फडणवीस हे कराड दौऱ्यावर आले असताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांची भेट घेतली आणि महाराष्ट्र स्कूटर्स कंपनी व मेडिकल कॉलेज सुरु करण्याबाबतचे लेखी निवेदन त्यांना दिले. यावेळी ना. चंद्रकांत पाटील, ना. सदाभाऊ खोत, ना. डॉ. अतुल भोसले, अविनाश कदम, अमोल मोहिते, राजू भोसले आदी उपस्थित होते. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दोन्ही मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. सातारा औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र स्कूटर्स ही एक जुनी आणि महत्त्वाची कंपनी आहे. या कंपनीबाबत सरकार आणि बजाज यांच्यात लवादाकडे अनेक वर्ष खटला सुरू होता. खटल्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निकाल बजाज यांना मान्य आहे. मात्र महाराष्ट्र सरकार या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले होते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानेही बजाज यांच्या बाजूने निकाल दिला असल्याचे समजते.

साताऱ्यातील उद्योजकता आणि रोजगार निर्मितीची निकड पाहता महाराष्ट्र स्कूटर्स कंपनी तातडीने सुरू होणे आवश्‍यक आहे. या कंपनीवर अवलंबून असणारे अनेक लहान- लहान उद्योग सध्या बंद आहेत. यामुळे बेरोजगारीची समस्या जटील बनली आहे. हे लहान- लहान उद्योग सुरू झाल्यास साताऱ्यातील औद्योगीकरणास चालना मिळणार असून बेरोजगारी नष्ट होण्याबरोबरच संबंधित उद्योगाशी निगडीत कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सुटणार आहे. याबाबत आपण संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलवावी, अशी मागणीही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान, साताऱ्यातील बहुचर्चित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे भिजतं घोंगडं कायम आहे. या मेडिकल कॉलेजची इमारत होईल तेव्हा होईल, तोपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या महिला रुग्णालय विभागाच्या इमारतीत मेडिकल कॉलेज सुरु करता येवू शकते. ही जागाही शासनाचीच आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी निर्णय घेण्यात यावा आणि यासाठी आवश्‍यक पदनिर्मिती करून पदे निश्‍चित करावीत, अशी मागणीही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असून दोन्ही मागण्यांबाबत ना. फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. दरम्यान, या दोन्ही प्रश्‍नांबाबत अधिवेशनातही पाठपुरावा करणार असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.