औंध : कोथरूड विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी माघार घेतली असून, सर्वांनी एकजुटीने काम करुन चंद्रकांतदादा पाटील यांना विजयी करायचे आहे, असा निर्धार यावेळी अमोल बालवडकर यांनी व्यक्त केला. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या तत्त्वावर भारतीय जनता पक्ष निष्ठेने जनतेची सेवा करत आला आहे.
मी या पक्षाचा एक भाग असल्याचा मला प्रचंड अभिमान आहे. त्यामुळे जनतेची सेवा करणे हा उद्देश नेहमीच राहिला आहे आणि तो एक लोकप्रतिनिधी या नात्याने पूर्ण देखील केला आहे. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोथरूड विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी निवडणूक लढवणार अशी इच्छा व्यक्त केली होती.
सुरुवातीपासून भारतीय जनता पक्षाच्या वतीने मला उमेदवारी मिळावी यासाठी मी आग्रही होतो. परंतु भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांना संधी मिळाली, काही गोष्टींवरून आमचे मतभेद होते, मात्र आज ते मतभेद माझे नेते आणि राज्याचे भारतीय जनता पार्टीचे सक्षम उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून दूर झाले आहेत.
त्यामुळे आज कोथरूड विधानसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी मी मागे घेत असून चंद्रकांतदादा पाटील यांना पाठिंबा देत आहे. आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा कोथरूड मध्ये भाजपाचा झेंडा फडकावण्यासाठी मी कटिबद्ध राहील आणि चंद्रकांतदादांच्या प्रचारार्थ मेहनत घेईल. विशेष म्हणजे या विधानसभेच्या सर्व प्रक्रियेत माझ्या सोबत असणारी जनता आणि कार्यकर्ते यांना विचारूनच मी हा निर्णय घेतला आहे.
शेवटी जनतेच्या शब्दाबाहेर मी कधीच जाणार नाही आणि येणाऱ्या काळात जनतेच्या हितासाठी अहोरात्र झटत राहील. यावेळी योगीराज नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर, भाजप कोथरुड उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, गणेश कळमकर, लहू बालवडकर,प्रल्हाद सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, राहुल कोकाटे, अनिल बालवडकर, राजेंद्र मुरकुटे, मोरेश्वर बालवडकर, यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.