भोर, (प्रतिनिधी) – भोर तालुक्यात असलेल्या रायरेश्वर किल्ल्यावरील मंदिर व परिसराच्या जागेबाबत गेल्या सात दिवसांपासून शिवभक्त समीर घोडेकर यांचे उपोषण भोर येथील राजवाडा चौकात सुरू आहे.
या संदर्भात शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांची एक व्हिडिओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल झाली होती.
त्या व्हिडिओच्या माध्यमातून या विषयाच्या अनुषंगाने उपोषण कर्त्याला पाठिंबा दर्शवणारे विधान केले होते.
याप्रकरणी रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेचे मानद सचिव अशोक थोपटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी संभाजी भिडे यांची भेट घेतली असून यावेळी नवरात्रीनंतर भोरमध्ये येऊन रायरेश्वरच्या जागेबाबत असलेल्या शंकेचे निरसन करू, असे संभाजी भिडे यांनी सांगितले आहे.
या जागेबाबात भिडे गुरुजींना सुरू असलेल्या उपोषणाच्या अनुषंगाने संबंधित जागेबाबत अपूर्ण व चुकीची माहिती देत त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
या भेटीवेळी डोंगरी विकास परिषदेचे मानद सचिव अशोक थोपटे यांनी या प्रकरणाची संपूर्ण सत्यता उलगडणारी कागदपत्रे त्यांच्यासमोर मांडून माहिती दिली.
त्यावर भिडे यांनी नवरात्रीच्या सणानंतर भोरमध्ये येऊन शंकेचे निरसन करू, असे फोनद्वारे तालुक्याचे आमदार संग्राम थोपटे यांना कळवले आहे. आता या प्रकरणावर संभाजी भिडे नवरात्रीनंतर भोरमध्ये येऊन काय बोलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
काय म्हटले होते संभाजी भिडे…
व्हिडिओ क्लिपद्वारे व्हायरल झाले होते की, शिवछत्रपतींचा अधिकार असलेल्या स्फूर्ती देणारा ठेवा ही राष्ट्राची संपत्ती आहे, हे लक्षात घेऊन त्याच्यावरचा अधिकार आम्ही सोडतो, असे त्यांनी मन मोठ करून समाजाच्या समोर आदर्श करावा, असे भिडे यांनी सांगितले होते.
तसेच समजा त्यांना ही बुद्धी सुचली तर आपल्या महाराष्ट्राचे व देशाचे सर्वांचे भाग्य !!, नाहीच सुचलं तर आपल्याला या घडलेल्या चुकीच्या विरुद्ध शासन दरबारी सर्व समाजाला घेऊन उभं राहवं लागेल, असे देखील भिडे यांनी म्हंटले होते.