मुलांना आवडीचे क्षेत्र निवडू द्या!

डॉ. सागर देशपांडे : मॉडर्न विद्यालयाकडून गुणवंतांचा गौरव

निगडी – पालकांनी आपल्या मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे करिअर करायची संधी दिली पाहिजे. आपल्या इच्छेचे ओझे मुलांवर टाकू नये, असे मत व्याख्याते डॉ. सागर देशपांडे यांनी व्यक्त केले.

निगडी येथील मॉडर्न विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी डॉ. देशपांडे बोलत होते. यावेळी दहावी, बारावी आणि शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. व्यासपीठावर संस्थेचे उपकार्यवाह शरद इनामदार, प्राचार्य सतीश गवळी, प्रा. मानसिंग साळुंके, संस्था सदस्य राजीव कुटे, पालक संघ उपाध्यक्षा रेखा धामणे, पालक संघ सदस्य सीताराम शिंदे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देशपांडे म्हणाले, पालकांनी मुलांशी लहान होऊन वागायला हवे. मुलांच्या आवडी- निवडी आणि कल यांचा विचार पालकांनी करायला पाहिजे. यावेळी अभ्यासाचे काही कानमंत्र देताना मुलांना मोबाइल, टी.व्ही. इंटरनेट अशा प्रलोभनापासून दूर ठेवले पाहिजे, असेही ते म्हणाले. घरात मुलगा-मुलगी असा भेद न करता दोघांना समान संधी दिली पाहिजे. मुलांना अपयश आल्यास त्यांच्या पाठिशी उभे राहत आले पाहिजे. तर उत्तम यश मिळाल्यास त्यांचे कौतुक देखील करायला हवे.

पालकांनी आपल्या मुलांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवल्यास त्यांचा विकास होण्यास नक्कीच मदत होते. शिक्षकांनीही प्रामाणिकपणे अध्यापन केल्यास विद्यार्थ्यांना मोठे यश मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले. प्राचार्य सतीश गवळी यांनी शैक्षणिक प्रगतीबाबत अहवाल सादर केला. संस्था उपकार्यवाह शरद इनामदार यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन आशा कुंजीर, सविता नाईकरे, सुजाता ठोंबरे यांनी केले. आभार सुरेखा कामथे यांनी मानले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)