पोलीसपाटलांना करोनामुक्‍तीचे धडे

भोर तालुका करोनामुक्‍त करण्याचा निर्धार

भोर  -भोर तालुक्‍यातील करोनाबाधितांची संख्या रोज वाढत असल्याने भोर प्रशासनाने तालुक्‍यातील 155 ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवकांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले असून, आता तालुक्‍यातील पोलीसपाटलांनाही मंगळवारी (दि. 14) करोनाला रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचे प्रत्यक्ष प्रशिक्षणाचे धडे दिले असल्याची माहिती भोर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे
यांनी दिली.

करोनाला तालुक्‍यातून हद्दपार करण्यासाठी मंगळवारी (दि. 14) नसरापूर येथे पोलीसपाटलांना प्रत्यक्ष योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी नसरापूर ते भोंगवली या भागातील 60 पोलीसपाटील उपस्थित होते, तर भोर तालुका पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमासाठी तालुक्‍यातील
हिर्डोशी, आंबवडे, वीसगाव, महुडे, वेळवंड, पसुरे विभागातील सुमारे 95 पोलीसपाटील सहभागी झाले होते.

गावांत, वाड्या-वस्त्यांवर बाहेरगावातून येणाऱ्या लोकांची नोंद ठेवणे, नोकरीनिमित्त बाहेर जाणाऱ्यांचे रजिस्टर तयार करून त्याची नोंद ठेवणे, करोनाची लक्षणे दिसल्यास त्याची क्षेत्रीय अधिकारी व आरोग्य विभागाला माहिती देणे, गावांत औषध फवारणी होते की नाही, याची माहिती प्रभारी अधिकाऱ्यास देणे, बाहेरून गावांत नियमित ये-जा करणाऱ्यांचे विलगीकरण करणे, त्याचे “फिट’ असल्याबाबतचे स्वयंघोषित प्रमाणपत्र घेणे व इतर उपाययोजनांची माहिती तालुक्‍यातील सर्व पोलीसपाटलांना देण्यात आली, अशी माहिती तनपुरे यांनी दिली.

यावेळी सर्व पोलीसपाटलांनी तालुक्‍यातील करोना हद्दपार करण्याची शपथ घेतली. भोर तालुक्‍यात 10 दिवसांचा लॉकडाऊन कडक केला असून, कोणासही अत्यावश्‍यक सेवेशिवाय भोरमधून पुण्याकडे जाता किंवा येता येणार नाही. नसरापूर, शिवापूर आणि माळेवाडी येथे तपासणी नाके सुरू केली असल्याचे यावेळी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.