पिंपरी – यंदाचा गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीकडे सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. खासदार, आमदार, महापौर, उपमहापौर, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्तांसह बहुतांश प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला दांडी मारली.
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त पोलीस आयुक्तालयाच्या संयुक्त विद्यमाने संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरामध्ये आज (मंगळवारी) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीचे अध्यक्षस्थान महापौर राहुल जाधव हे भूषविणार होते.
मात्र जाधव सध्या सांगली, कोल्हापूर परिसरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेले आहेत. त्यामुळे ते बैठकीला अनुपस्थित होते. परंतु महापालिका भवनात उपस्थित असलेल्या उपमहापौर सचिन चिंचवडे व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी देखील बैठकीला जाण्याची तसदी घेतली नाही. पोलीस आयुक्त हे गेले काही दिवस रजेवर होते. ते आजच शहरात दाखल झाले मात्र त्यांनीही बैठकीकडे पाठ फिरविली.