‘झूम मिटिंग ऍप’द्वारे विद्यार्थी गिरवताहेत धडे

ऑनलाइन शिक्षण प्रणाली शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी “लर्न फ्रॉम होम’

तळेगाव स्टेशन – करोना विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण जगात विळखा घातला आहे. त्याचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन केले. ऐन परीक्षेचा काळ तोंडावर आला असताना राज्यभरातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. मात्र एमआयटी ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ऍण्ड कॉमर्स तळेगावने विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी “लर्न फ्रॉम होम’चे नियोजन केले आहे. ऑनलाइन शिक्षणपद्धतीचा वापर सुरू करून मुलांना शिक्षण देत कॉलेज सुरू ठेवले आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य विनोद साळवे म्हणाले की, विद्यार्थी आणि शिक्षकांना या उपक्रमाची माहिती देण्यात आली. त्यानंतर एप्रिल महिन्याचे वेळापत्रक बनविण्यात आले. या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 4 एप्रिलपासून ऑनलाइन वर्ग नियोजनानुसार सुरू झाले. “व्हिडिओ’, “ऑडिओ’द्वारे शिकविण्यासाठी गूगल, झूम ऍपचा वापर करीत आहेत. त्यामुळे मुलांचा अभ्यास नियमित सुरू आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात सुसंवाद घडू लागला आहे.

विद्यार्थी आणि शिक्षकांनी “झूम मिटिंग’ या ऍप्लिकेशनद्वारे एकत्र येतात. दररोज तीन तासांचे ऑनलाइन शिक्षण सकाळी नऊ ते बारा या वेळेत शिक्षक विद्यार्थ्यांना देतात. झूम मीटिंग ऍप्लिकेशन वापरून मुलांना घरी बसून देखील फळ्यावर लिहिलेले सर्व काही घरच्या मोबाईल, कॉम्प्युटरवर दिसून येते. विद्यार्थ्यांना विज्ञान आणि वाणिज्य या दोन्ही शाखांमधील सर्व विषयांची माहिती दिली जाते. तसेच मनोरंजन म्हणून विद्यार्थी सध्या काय करताहेत याची देखील माहिती “शिक्षक’ या ऍपद्वारे येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजच्या शिक्षणाप्रमाणे शिक्षण मिळत असल्यामुळे महाविद्यालय बंद असताना देखील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत नाही.

या व्यतिरिक्‍त अभ्यासाबरोबरच काही चित्रपट व नाटक यासंदर्भातही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येत असून, त्यावर चर्चा आणि चांगली पुस्तके विद्यार्थ्यांनी या कालखंडात वाचावी त्यातून वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी पुस्तक परिचय हा उपक्रम ही लवकरच सुरू करणार असल्याचे प्राचार्य विनोद साळवे यांनी सांगितले. या उपक्रमासाठी लागणाऱ्या संपूर्ण तांत्रिक बाबी इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी विषय शिकविणाऱ्या शिक्षिका फरहाना अल्मेल यशस्वीपणे सांभाळत आहेत. याच बरोबर वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील सर्व शिक्षक आपल्या जबाबदाऱ्या सांभाळत सर्व अडचणींवर मात करत विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र झटून उपयुक्‍त मटेरियल तयार करीत आहेत.

घरे बनली ज्ञानमंदिरे…
“लर्न फ्रॉम होम’ या अभिनव संकल्पनेतून कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक घरी बसूनच ज्ञानदानाचे काम करीत आहेत. ही अभिनव संकल्पना विद्यार्थ्यांनादेखील रुचत असून, विद्यार्थी आवडीने त्यात भाग घेत आहेत. या ऑनलाइन शिक्षण प्रणालीत अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे प्रत्येक विद्याथ्यांचे घर हे आता ज्ञानमंदिर बनले आहे. ‘लॉकडाऊन’मध्ये घरी सुरक्षित राहून शिक्षणात खंड पडू न देणारा व शिक्षणास उपयुक्‍त अशा शैक्षणिक उपक्रमाचे पालक कौतुक करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.