लोणचे उत्पादकांची लिंबाच्या खरेदीकडे पाठ

पुणे – मार्केट यार्डातील फळ विभागात मोठ्या प्रमाणात कच्चा, कमी दर्जाच्या लिंबाची आवक होत आहे. त्यामुळे लोणचे उत्पादकांनी त्या लिंबाच्या खरेदीकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येत आहे.

सध्या हिवाळा सुरू आहे. लिंबांना लोणचे उत्पादकांकडून या कालावधीत दरवर्षी मागणी असते. लोणच्यासाठी पिवळ्या रंगाच्या आणि रसदार लिंबे आवश्‍यक असतात. मात्र, सध्या बाजारात दाखल होत असलेली लिंबे ही अपरिपक्व असून, ती हिरवी आहेत. त्यामध्ये रसाचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे त्यांना मागणी नसल्याचे लिंबाचे व्यापारी रोहन जाधव यांनी सांगितले. रविवारी मार्केटयार्डात तब्बल 3 ते 4 हजार गोण्यांची आवक झाली. त्यातील 80 ते 90 टक्‍के लिंबे कमी दर्जाची होती.

घाऊक बाजारात लिंबास प्रति गोणीस 100 ते 200 रुपये भाव मिळत आहे. नगर, कर्जत, राशीन आणि सोलापूर भागांतून मार्केटयार्डात लिंबांची आवक होत आहे. हिरवी लिंबे बाजारात विक्रीसाठी आणू नयेत परिपक्व लिंबे बाजारात आणावीत, त्यास चांगली मागणी राहील आणि भावही चांगला मिळेल, असे आवाहन लिंबांचे व्यापारी रोहन जाधव यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.