अमेरिकेतील आर्यनचे वाघापूर शाळेत धडे

शिक्षण, सांस्कृतिक विषयावर विचारमंथन : मातीशी नाळ अजूनही जोडलेली

भुलेश्‍वर – माहिती तंत्रज्ञान आणि भौतिक सुविधांच्या युगात व्यक्‍ती सातासमुद्रापार पोहचला असला तरी मातृभूमीची नाळ कायम जोडलेली असते. पुरंदर तालुक्‍यातील वाघापूर येथील आर्यन कुंजीर हा अमेरिकत नववीमध्ये शिक्षण घेत आहे. पाश्‍चात्त्य शिक्षण पद्धती आणि सांस्कृतिक विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी आर्यनने वाघापूर येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणातील दूरदृष्टीचे धडे दिले.

शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता यावे, याकरिता बारा वर्षांपूर्वी वाघापूर येथील यशवंत खवले यांनी काही तज्ज्ञ मंडळींना सोबत घेऊन शारदा इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना केली. अमेरिकेतील शिकागो येथे जे. बी. कोनंट शामबर्ग स्कूल येथे नवव्या इयत्तेत शिकणारा व मूळ वाघापूर येथील रहिवासी असणारा आर्यन संतोष कुंजीर याने अमेरिकेतील शिक्षण पद्धती आणि भारतीय शिक्षण व सांस्कृतिक परिस्थिती आणि विद्यार्थ्यांना भविष्यात शैक्षणिक व नोकरीविषयक असणाऱ्या संधी याविषयी मार्गदर्शन केले.

आर्यन म्हणाला की, भारताला अमेरिकेतील शाळांप्रमाणेच शैक्षणिक वेळ वाढविण्याची गरज आहे. अमेरिकेत आमची शाळा दररोज सकाळी 8:30 ते दुपारी 3:30 पर्यंत असते. भारतातील शाळा 6 तास सुरू असतात. यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत खवले, प्राचार्या हेमाली गोसावी, पोपट कुंजीर, शारदा कुंजीर, पांडुरंग खवले गुरुजी, संस्थेचे विश्‍वस्त कौस्तुभ भोंडे, सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.