अर्थवेध: एका विमान अपघाताने जगाला दिलेला धडा!

यमाजी मालकर

अलीकडे अपघात झालेल्या इथोपियाच्या विमानात तब्बल 35 देशांचे नागरिक होते, या वर्तमानाने आणि बोईंग 737 मॅक्‍स 8 ही विमाने उड्डाणासाठी असुरक्षित आहेत, या शक्‍यतेने जग हादरून गेले आहे. सुरक्षित आणि एका जगाच्या दिशेने वाटचाल हाच जगाचा प्रवास असला पाहिजे, हा या अपघाताचा खरा धडा आहे.

भारतापासून 5 हजार किलोमीटर दूर असलेल्या इथोपियाची राजधानी अदिस अबाबाजवळ 10 मार्च रोजी विमान अपघात झाला. विमान अपघातांचे प्रमाण गेले काही वर्षे खूपच कमी झाले आहे. मात्र, हा अपघात वेगळ्या कारणांनी जगाला हादरवणारा ठरला. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे विमानातील 157 प्रवाशांमध्ये जगातील तब्बल 35 देशांचे नागरिक होते. देशाच्या सीमांना भिंती उभ्या करण्याचे अजून थांबले नसताना जागतिकीकरणाने जगात नागरिकांची अशी काही सरमिसळ केली आहे की त्या दिशेने होणारा प्रवास आता कोणीच रोखू शकणार नाही. विमान इथोपियाहून केनियाला चालले होते, हे दोन्हीही देश जगातील प्रमुख देश नाहीत. मात्र, या विमानात जगातील सर्व प्रमुख देशांचे नागरिक होते. भारताचे 4 नागरिक या अपघातात मृत्युमुखी पडले, तसे अमेरिका, चीन, कॅनडा, स्वीडन, स्पेन, जर्मनी, रशिया, पोलंड, इटली, नेदरलॅंड्‌स, ब्रिटन, फ्रान्स, इजिप्त, नेपाळ, ऑस्ट्रिया, इस्रायल, ट्युनिसीया अशा 35 देशांचे नागरिक विमानात होते. ते कशासाठी नैरोबीला चालले होते, ही चर्चा करण्याची ही जागा नाही. मात्र, ती कारणेही इतकी वेगळी आहेत की, त्यातूनही जगात होत असलेली सरमिसळ तर पाहायला मिळतेच, पण एका देशाचे भले पाहण्याऐवजी सर्व जगाच्या भल्याची अपरिहार्यता आणि त्यासाठी जागतिक व्यवस्थेची गरज अधोरेखित होते.

रस्त्यावर दररोज हजारो नागरिक मृत्युमुखी पडतात, त्याची जगव्यापी चर्चा झाली, असे कधी झाले नाही. विमान अपघाताची मात्र जगभर चर्चा होते. कारण विमानात श्रीमंत आणि मोठी माणसे प्रवास करत असतात, अशी चर्चा एकेकाळी केली जात होती. पण अशी चर्चा आता मागे पडली आहे, कारण विमान प्रवास आता तितका दुर्मीळ राहिलेला नाही. कामानिमित्त का होईना पण मध्यमवर्गातील नागरिकही आता विमानात प्रवास करताना दिसत आहेत. तो सर्वात सुरक्षित प्रवास आहे, हेही त्याचे एक कारण आहे. अर्थात, जगात विमान प्रवासाचे एक अर्थचक्र तयार झाले असून त्यासाठी हवाई वाहतुकीचा सातत्याने विस्तार होतो आहे. कारणे काहीही असो, विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या वेगाने वाढते आहे, हे खरे आहे. भारतासारख्या मोठ्या देशात त्या वाढीचा वेग जगात सर्वाधिक आहे, याचेही आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही.

या अपघाताने आणखी एक बाब जगासमोर आणली आहे. ती म्हणजे अशा एखाद्या घटनेचे परिणाम जगात किती व्यापक असू शकतात, याची एक चुणूक पाहायला मिळाली आहे. इथोपियन एअरलाईनच्या ताफ्यातील बोईंग 737 मॅक्‍स 8 या जातीच्या नव्याकोऱ्या विमानाला हा अपघात झाला. इथोपिया या देशाची ओळख आफ्रिकेतला एक गरीब देश अशी असली तरी इथिओपियन एअरलाइन्स ही जगातील एक चांगली आणि सुरक्षित विमान कंपनी मानली जाते. बोईंग या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीने बोईंग 737 मॅक्‍स 8 या जातीची विमाने जानेवारी 2016 मध्येच आणली असून केवळ 6 महिन्यांपूर्वी इंडोनेशियाच्या लॉयन कंपनीचे याच जातीचे विमान जावा समुद्रात कोसळून 189 प्रवासी मृत्युमुखी पडले होते. हे दोन्ही अपघात विमानाचे उड्डाण झाल्यानंतर काही मिनिटातच झाल्याने या विमानातच काही विशिष्ट बिघाड आहे काय, याचा शोध घेण्याचे काम सुरू झाले आहे. पहिल्या अपघातानंतर या विमानात काही दुरुस्ती करण्यात आली होती. 100 वर्षे विमानांची निर्मिती करणारी बोईंग कंपनी या अपघाताने हादरून गेली आहे.

कारण तिची स्पर्धक फ्रान्सची कंपनी एअर बसने 320 निओ ही किफायतशीर विमाने बाजारात आणल्यापासून या स्पर्धेत बोईंग मागे पडली होती, बोईंग 737 मॅक्‍स 8 ने ती उणीव भरून काढली. त्याला जगभरातून मागणी आली.
कंपनीकडे या अपघातापूर्वी या जातीच्या तब्बल साडेचार हजार विमानांची मागणी नोंदविलेली आहे. केवळ दोन वर्षांत बोईंगने अशी 350 विमाने विकली आहेत. अंदाजे चारशे कोटी रुपयांना एक विमान असे हे प्रचंड गणित असल्याने कंपनीच्या अर्थकारणावर तर अपघाताचा परिणाम झालाच, पण आतापर्यंत जगातील ज्या कंपन्यांनी ही विमाने घेतली आहेत, त्यांचेही अर्थकारण संकटात सापडले आहे. दोन्हीही अपघात एकाच प्रकारचे असल्यामुळे या जातीच्या विमानांचा वापर थांबविण्याचा निर्णय भारतासह अनेक देशांनी जाहीर केला आहे. विमानाची निर्मिती ही अतिशय उच्च तंत्रज्ञानाची मानली जाते. त्यामुळेच जगातील चार-पाचच देश प्रवासी विमानाची निर्मिती करतात. उच्च तंत्रज्ञानाचा वापर माणूस सहजपणे करू लागला आहे, पण त्यासोबत त्याच्या मनात भीतीने कसे घर केले आहे, हेही या अपघाताने दिसून आले आहे. ज्या तंत्रज्ञानाचा तो अभिमानाने उल्लेख करतो, त्यातही त्रुटी राहूच शकते, हेही जगात पुनःपुन्हा सिद्ध होते आहे. गेल्या काही वर्षांत महागड्या गाड्या, कंपनीने काही त्रुटी राहिल्याने परत बोलावण्याच्या घटना घडल्या आहेत.

बोईंगच्या या विमानाचे उड्डाण होत असताना त्याच्या वजनाचे असंतुलन होते, अशी एक बाब समोर आली आहे, अर्थात, त्यावर अजून शिक्कामोर्तब झालेले नाही. या सर्व पार्श्‍वभूमीवर गेले काही दिवस काही देश, काही कंपन्यांनी या जातीच्या विमानांचे उड्डाण थांबविले आहे. याचा अर्थ शेकडो विमाने उभी आहेत आणि विमान प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडले आहे. काहीतरी चुकते आहे, एवढे तर मान्य केलेच पाहिजे.

इथोपियातील अपघाताने जगाला काही धडे दिले…

1. जागतिकीकरणाने जग इतके जवळ आणले आहे की, जगाच्या एका कोपऱ्यात घडलेल्या एका घटनेचा आणि आपला संबंध आहे, हे वेगवेगळ्या पद्धतीने सिद्ध होऊ लागले आहे.
2. तंत्रज्ञानावर विसंबून माणूस जगण्याचा जो वेग वाढवत चालला आहे, तो अंतिमत: धोकादायक आहे.
3. उद्योग, व्यवसाय आणि देशांतील व्यापार स्पर्धा माणसांचा जीव कमी महत्त्वाचा ठरविते आहे का, याकडे अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे.
4. सुरक्षिततेला महत्त्व देताना माणसांच्या मनात मात्र असुरक्षितता वाढत चालली आहे.
5. जगातील नव्या बदलांनी जग जवळ येते आहे आणि त्यामुळे जगातील सर्व भागांत शांतता आणि सुव्यवस्था नांदण्यासाठी एका जगाच्या दिशेने जाण्यासाठी एक चलन, एक करपद्धती, एक प्रशासन आणि परस्परांवरील विश्‍वासाच्या दिशेने आता वाटचाल होण्याची गरज आहे.
6. निसर्गाने देशाच्या भिंती कधीच मानल्या नाहीत, त्याने परस्परावलंबनाची अपरिहार्यता स्वीकारली आहे. मानवानेही त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निसर्गाकडून या गोष्टी घेतल्या पाहिजेत.

Leave A Reply

Your email address will not be published.