पुणे – शहरात बाधित संख्येचा आलेख उतरत असताना, सक्रिय बाधितांच्या संख्येतही निम्म्याने घट झाली आहे. सप्टेंबर महिन्यांत जवळपास 18 हजारांवर असलेली सक्रिय बाधित संख्या आज 9 हजार 507 वर आली आहे. तर दिवसभरात नव्याने 366 करोना बाधित सापडले असून, बाधितांची एकूण संख्या 1 लाख 57 हजार 417 वर पोहचली आहे.
पुण्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला. त्यावेळी सक्रिय बाधितांसह अत्यवस्थ बाधितांची संख्या एक हजारापर्यंत पोहचली होती. आज, ही संख्या 821 असली तरी समाधानकारक नाही. त्यामुळे मृत्युचे प्रमाण कमी होत नाही.
ज्यावेळी अत्यवस्थ बाधितांची संख्या कमी होईल, त्यावेळी मृत्युची संख्याही कमी होईल. रविवारी (दि. 19) दिवसभरात 3 हजार 66 संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली.