मुंबई – बिबट्या व मानव संघर्षाला आळा घालण्यासाठी बिबट्यांची नसबंदी करण्याची मागणी वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारही सकारात्मक असल्याचे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी स्पष्ट केले आहे. बिबट्यांची नसबंदी करण्याचा विचार करण्यासंबंधी आमदार सत्यजित तांबे यांचे पत्र आले आहे.
मानवी वस्तीत बिबटे शिरकाव करत असतील तर काही विशिष्ट उपाययोजना केल्या पाहिजेत. बिबट्यांच्या नसबंदीसाठी केंद्राची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे केंद्राच्या परवानगीसाठी हे पत्र पाठवण्यात आले असून, त्यासाठी केंद्रीय मंत्र्याचीही भेट घेतली जाईल, अशी माहिती नाईक यांनी दिली.
दरम्यान, नागपूर येथील वाघांच्या मृत्युप्रकरणी चौकशी सुरू असून अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात गेल्या वर्षी 2023-24 मध्ये 26 वाघांचा मृत्यू झाला आहे तर यंदा 13 वाघांचा मृत्यू झाला आहे. काही मृत्यू अपघाती आहेत, तर काही ठिकाणी डुकराची शिकार करण्याकरिता इलेक्ट्रिक वायर वापरण्यात आली होती. त्यात वाघ सापडल्याने मृत्यू झाला आहे.