लोणी धामणी -आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मेंगडेवाडी, जारकरवाडी, निरगुडसर, पोंदेवाडी, लाखणगाव, काठापूर बुद्रुक, देवगाव या गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
लोणी-मंचर रस्त्यावरील पहाडदरा घाटातील जंगलामध्ये बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. चारही बाजूंनी डोंगराच्या कुशीत असणारा हा परिसर पावसाळ्यात निसर्ग सौंदर्याने बहरलेला असतो, त्यामुळे पहाडदारा, निरगुडसर, अवसरी, मेंगडेवाडी गावांतील नागरिक सकाळ-संध्याकाळ चालण्यासाठी घाटात जातात.
मंगळवारी (दि. 8) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हरी थोरात, दिलीप टाव्हरे, बाबाजी विश्वास, अरुण गोरडे हे घाटमाथ्यावर चालून झाल्यावर आपल्या चारचाकीने परत घरी निघाले असता याच रस्त्यावर मालदरा (मेंगडेवाडी) येथे बिबट्या गाडीला आडवा गेला. गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला; पण तोपर्यंत बिबट्याने रस्त्याच्या उजव्या बाजूला असणाऱ्या दाट झाडीत धूम ठोकली.