भिलार : जावळी तालुक्यातील काटवली व शिंदेवाडी या गावात बिबट्याने तीन शेळ्या व एक कुत्रा फस्त केल्याने गावासह परिसरात खळबळ उडाली आहे. शेळ्या बिबट्यानेच फस्त केल्याची माहिती पशुपालकासह नागरिकांनी दिली.
काटवली येथील विजय परबती बेलोशे यांच्या कोरदाळा शिवारात चारण्यासाठी गेलेल्या शेळ्यांपैकी एक शेळी गायब झाल्याने ते शोधण्यासाठी गेले असता रानटी जनावरांने फाडून खाल्ल्याचे निदर्शनास आले. रामचंद्र शंकर बेलोशे यांचीही शेळी फस्त केल्याचे समजले. गावाला लागूनच असणाऱ्या शिंदेवाडी गावातील शिवारात चरणाऱ्या भाऊसाहेब शिंदे यांच्या शेळीवरही बिबट्याने झडप घालून गायब केली आहे. याच गावातील गणेश राजाराम शिंदे यांचे कुत्रे बिबट्याने नेल्याचे सांगितले. तब्बल तीन शेळ्या अचानक फस्त झाल्याने शेतकर्याचे मोठे नुकसान झाले. त्यांना आर्थिक मदत मिळावी व बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी काटवली व शिंदेवाडी गावातील नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे. पाचगणी व परिसरात बिबट्यांने दहशत निर्माण केल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
पाचगणीत काही दिवसांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेर्यात बिबट्याचा धुमाकूळ कैद झाला. शहरात व डोंगररांगात बिबट्यांचा मुक्त संचार असल्याचे दिसून येत आहे. भिलारमध्ये बिबट्या विहिरीत पडल्याने त्याला नागरिकांनी जीवदान दिले होते. या घटनांमुळे बिबट्या या परिसरात वास्तव्यास असल्याचे निदर्शनास येत आहे. बिबट्याने शेळ्या फस्त केल्याच्या घटना समोर आल्याने पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले. दहशत निर्माण करणारे बिबटे जेरबंद होत नाहीत, तोपर्यंत नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन करण्यात येत आहे.