आंबेगावच्या पूर्व भागात बिबट्याची दहशत

संग्रहित फोटो

– विशाल करंडे

लाखणगाव – आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील काठापूर बुद्रुक, लाखणगाव या दोन गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परिणामी ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी वारंवार मागणी करूनही वनखात्याच्या वतीने कुठलेही ठोस पावले उचलले जात नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्‍त केली आहे.

मागील चार ते पाच वर्षांपासून आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर बिबट्यांचे वास्तव्य आहे. हा परिसर घोडनदी आणि उजव्या कालव्याच्या मधोमध येत असल्याने पूर्णपणे बारमाही बागायती आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. उसाच्या क्षेत्रामुळे बिबट्यांच्या वास्तव्यासाठी अनुकूल वातावरण असून, येथील शेतकऱ्यांची पाळीव जनावरे हे बिबट्यांचे भक्ष्य बनत आहेत. मागील अनेक वर्षांपासून हा परिसर बिबट्यांच्या दहशतीखाली आहे. कायमस्वरूपी उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली असतानाही प्रशासनाची उदासीनता व राजकीय नेत्यांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

लाखणगाव येथील सतीश रोडे यांच्या घरासमोरील कुत्र्यावर बिबट्याने दोनदा हल्ला केला होता. काठापूर बुद्रुक परिसरात महिनाभरात तीन ते चार शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले असून, यातील दोन शेतकऱ्यांनी बिबट्यांचे आपल्या मोबाइलमध्ये चित्रीकरण केले आहे. प्रशासनाच्या वतीने कोणत्याही उपाययोजना या ठिकाणी केल्या नाहीत. अजूनपर्यंत वनखात्याने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला नाही. जर पिंजरा लावला तर त्या ठिकाणी बिबट्यासाठी भक्ष्य म्हणून काय ठेवायचे, हा विषय महत्त्वाचा आहे. बिबट्याला पकडण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी पथक स्थापन करण्याची मागणी केली जात आहे.

जीव मुठीत धरून शाळेत प्रवेश
शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या लहान मुलांना शाळेत दूरवर जावे लागते. घरापासून शाळेपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या कडेने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र असल्याने लहान मुले जीव मुठीत धरून शाळेत ये-जा करीत असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही बिबट्यांचा परिणाम झाला आहे. बिबट्यांच्या दहशतीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर्वी रात्री दिसणारे बिबटे आता दिवसाही दिसू लागल्याने शेतात काम करणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे.

आंबेगाव तालुक्‍यात असणारे उसाचे क्षेत्र हे बिबट्यांसाठी पोषक आहे, त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर बिबटे आढळतात. मानव व बिबट यांच्यातील संघर्ष रोखण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे. बिबट्याप्रवण गावांतील लोकांना घेऊन रेस्क्‍यु टीम बनविण्यात आली असून, उपवनसंरक्षक जुन्नर जयरामे गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती सुरू आहे.
– योगेश महाजन, वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर


आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर बिबटे दिसत आहेत, त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. वन विभागाने यावर ठोस उपाययोजना करावी.
– उल्हास करंडे, शेतकरी, काठापूर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)