कुत्र्याला पळवले : कॅमेऱ्यात बिबट्या कैद
केंदूर (प्रतिनिधी) – मुखई (ता.शिरूर) येथील अनिल येवले यांच्या कुत्र्याचा बिबट्याने फडशा पाडला आहे. कुत्र्याला पळवून नेताना बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मुखई, करंदी, जातेगाव, पिंपळे जगताप परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. करंदीमध्ये या अगोदर दोन वेळा एका कुत्र्यासह वासराचा बिबट्याने फडशा पाडला आहे. पिंपळे जगताप, जातेगाव खुर्द येथील चाकण रोड परिसरात वारंवार बिबट्याला नागरिकांनी पाहिले आहे. वनविभागाने पिंजरा लावून देखील अद्यापपर्यंत बिबट्या पिंजऱ्यात अडकला नाही. मात्र परिसरातील पाळीव प्राण्यावर वारंवार बिबट्या हल्ला करत असल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.
करंदीच्या मुखई रोड परिसरात रोजच बिबट्यांच्या पाऊलखुणा पाहायला मिळत असल्याने बिबट्याच्या भीतीने शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात जायला घाबरत आहेत. नुकताच मुखई येथील अनिल येवले यांच्या घराच्या कुंपणाच्या आत असलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून पळवून नेल्याचा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरा लावला. मात्र, बिबट्याने रात्री पिंजरा पाहून धूम ठोकली व आणखी एका शेतकऱ्याचा कुत्र्यावर हल्ला केला. अशा घटना परिसरात वारंवार घडत आहेत. मात्र, या बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आलेले नाही. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने योग्य त्या उपाययोजना करून लवकरात लवकर या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी गणेश मानकर, युवराज ढोकले, अनिल येवले यांनी केली आहे.