चाफळ -गतवर्षी जुलै महिन्यात कळंत्रेवाडी, नाणेगाव (पुनर्वसन), खालकरवाडी तसेच माजगाव ता. पाटण येथील संपूर्ण परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्याची पुनरावृत्ती कळंत्रेवाडी आणि परिसरात पुन्हा एकदा होतेयं की काय? अशी भिती ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. मंगळवारी पहाटे चार वाजता येथील शेतकरी अनिल थोरात यांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी शेताला पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
अनिल थोरात हे उत्तरमांड काठालगत असणाऱ्या त्यांच्या विहिरीवर विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेले असता नदी काठावरून विहिरीकडे येत असलेला बिबट्या त्यांच्या नजरेस पडला. ही गोष्ट गावात समजल्यानंतर सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील बहुतांश शेतकऱ्यांच्या सिंचनविहिरी या उत्तरमांड नदी काठालगत असल्यामुळे रात्रीच्यावेळी विद्युत मोटर चालू करण्यासाठी या परिसरात जावे लागते. त्यामुळे वनविभागाने तात्काळ या परिसरात सापळा रचावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.