कात्रज (प्रतिनिधी) – कात्रज डोंगररांगा व घाट परिसरात सहा महिन्यांपूर्वी दोन बिबटे आढळून आले होते. वनविभागाने मोठ्या शिताफीने त्यांना पकडले होते. परंतु, भिलारेवाडी येथील धनावडेनगर नागरीवस्तीलगत पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
एक मादी व दोन बछड्यांचा वावर असल्याचे सांगितले जात असल्याने मॉर्निंग वॉक, जॉगिंगला जाणाऱ्या; तसेच रात्री उशिरा या परिसरात असलेल्या नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
गुजर-निंबाळकरवाडी व भिलारेवाडी हद्दीलगत घाट परिसरात हत्ती डोंगर, आंबील ढग अशा अनेक टेकड्या व डोंगर असून, दोन मोठे पाझर तलावदेखील आहेत. त्यामुळे वन्य पशू-पक्ष्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. कात्रज घाट परिसरात मनपा व ग्रामपंचायत हद्दीतील कचरा सर्रास टाकला जातो.
तसेच मांस दुकानातील कचराही फेकला जातो. त्यामुळे शहरातील मोकाट कुत्री, डुक्कर रात्रीच्या वेळी येतात, त्यांची सोपी शिकार करण्यासाठी बिबटे येत असावेत, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. कात्रज घाट व डोंगररांगा नागरी वस्तीजवळ असल्याने संबंधित वनविभागाने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
रात्रीच्या वेळी बिबट्या दिसत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे भल्या पहाटे अथवा सायंकाळी उशिरा डोंगरावर ट्रेकिंग किंवा मॉर्निंग वॉकसाठी जाताना नागरिकांनी एकटे जाऊ नये. सावधानता बाळगावी. बिबट्याचा ट्रेस काढण्याचे काम सुरू असून, त्यानुसार पिंजरे लावले जातील.
– संभाजी धनावडे, वनरक्षक, भिलारेवाडी वनविभाग