शिरूर : शिरूर तालुक्यातील शास्ताबाद येथील बिबट्याच्या हल्ल्यात बकऱ्या १० ठार तर पाच जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे शास्ताबाद शिवारात उघडकीस आली. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याचे १ लाख ते १. ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
तालुक्यातील शास्ताबाद येथील शेतकरी चंद्रकांत गोरडे यांची शास्ताबाद शिवारातील गट नंबर.९१ मध्ये वडिलोपार्जित शेती आहे. या शेतात त्यांनी पशुधनासाठी मोठी जाळी तयार केली आहे. या जाळीत त्यांनी बकऱ्या ठेवल्या होत्या. शेतकरी गोरडे यांनी रविवारी (ता.5 ) सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास जाळी बंद करून व शेतातून घरी परत गेले. दरम्यान, रात्रीच्या सुमारास बिबट्याने जाळीच्या आत प्रवेश करून बकऱ्यांवर हल्ला चढवला. यावेळी बिबट्याने दहा बकऱ्याचा फडशा पाडला. तर, पाच बकऱ्या जखमी झाल्या होत्या. तसेच निमगाव दुडे येथील राहुल घुले यांचा घोडा बाहेर असताना बिबट्याने हल्ला करून ठार केले आहे.
जखमींपैकी एक बकरी (ता. ६) सायंकाळी सहाच्या सुमारास दगावली. अन्य जखमी बकऱ्यांवर उपचार सुरू आहेत.शेतकरी चंद्रकांत गोरडे हे आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास शेतात गेले असता, सदर प्रकार उघडकीस आला. या घटनेत त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अन्य बकऱ्या जखमी असल्याने नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. माहिती मिळताच वनरक्षक गणेश पवार हनुमंत कारकूड कारकूड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. वनविभागाने संबंधित शेतकऱ्याला शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी. तसेच सदर बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
बिबट्याची दहशत कायम
काही दिवसांपूर्वी कान्हूर मेसाई शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाला होता. शास्ताबाद शिवारात एका शेतकऱ्याला मादी बिबट्यासह दोन शावक मुक्तसंचार करताना दिसून आले होते. त्यापूर्वी चिंचोली मोराची, कान्हूर मेसाई, लाखेवाडी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरू होता. त्यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाले होते. आता शास्ताबाद शिवारात बिबट्या अवतरला आहे. वनविभागाने या हिंस्त्रप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ
सध्या रब्बीचा हंगाम असल्याने शेतकऱ्यांना रात्री अपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. परंतु तालुक्यातील विविध भागात बिबट्याचा मुक्तसंचार दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. अनेक ठिकाणी मजूर वर्ग शेतात जाण्यास धजावत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.