येरवडा/विश्रांतवाडी, दि. 23 (प्रतिनिधी) -आळंदी रोडवर विश्रांतवाडीजवळ असलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) संशोधन आणि विकास आस्थापना, अभियंता (आर अँड डीई) परिसरात मंगळवारी पहाटे बिबट्या आढळून आला. बिबट्याच्या शोधासाठी पहाटेपासुन वनविभागाचे आणि रेस्क्युची टिम कार्यरत आहे.
सरंक्षण विभागाशी संबंधित असलेल्या या विभागात सुरक्षेसाठी टॉवर बसविलेले आहेत. या टॉवरवर नेमलेल्या सुरक्षारक्षकाला हा बिबट्या प्रथम दिसला, वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिल्यानंतर वनविभाग आणि रेस्क्यु टीमने या ठिकाणी येऊन शोधकार्य सुरू केले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या ज्या ठिकाणी दिसून आला त्या जवळपासच्या परीसरात शोधकार्य सुरू आहे. डीआरडीओचा परीसर मोठा असून अनेक झाडी आहे. भारतीय संरक्षण दलांसाठी विविध अभियांत्रिकी प्रणालींवर शोध आणि विकास करण्याचे काम या संस्थेत चालते. जवळपास 500 कर्मचारी या संस्थेत आहेत. या विभागालगतच ग्रेफ सेंटर आणि टि बाय टु यांचाही मोठा भाग आहे. हा भाग झाडीने व्यापला असल्याने अन्नाच्या शोधात बिबट्या येथे आला असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, डीआरडीओ हा परिसर जवळपास 100 एकर पेक्षा अधिक आहे. तसेच झाडाझुडपांचा भाग असल्याने बिबट्या लगेचच दिसून येणार नाही. मात्र, वनविभाग आणि रेस्क्यु टिम बिबट्याला शोधण्याचे काम करीत आहे. नागरिकांनी घाबरू नये, असे वन अधिकारी आशुतोष शेडगे यांनी सांगितले.
परिसरात बिबट्या असल्याची माहिती पहाटे आमच्या सुरक्षारक्षकाकडून मिळाली. वनविभागाला याची लगेचच माहिती देण्यात आली. सुरक्षेच्या कारणामुळे आज अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना प्रवेशद्वारावरच थांबविण्यात आले. या तांत्रिक कारणामुळे येथे वनविभागाचे ड्रोन चालत नसल्याने डीआरडीओचे ड्रोन वनविभागाला देण्यात आले आहेत. – प्रदीप कुरुळकर,
संचालक, संरक्षण (डीआरडीओ) संशोधन आणि विकास आस्थापना