भगवानगड परिसरात बिबट्याचा महिलेवर हल्ला

नरभक्षक मोकाट असल्यावर शिक्कामोर्तब; दिव्यांग पतीच्या प्रतिहल्ल्याने वाचले प्राण

पाथर्डी – तालुक्‍यातील खरवंडी कासार परिसरातील भगवानगड लमाण तांडा येथे बिबट्याने एका महिलेच्या चेहऱ्यावर पंजाचा प्रहार करून तिला जखमी केले. यावेळी या महिलेच्या दिव्यांग पतीने बिबट्यावर दगडांचा मारा केल्याने बिबट्याने धूम ठोकली. त्यामुळे या महिलेचे प्राण वाचले. हा प्रकार आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेमुळे नरभक्षक बिबट्या मोकाट असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास भगवानगड लमाण तांडा येथील छबूबाई एकनाथ राठोड (वय 45) या पती एकनाथ दासू राठोड (वय 50) यांच्यासमवेत शेतात काम करत होत्या. यावेळी बिबट्याने छबूबाई यांच्यावर अचानक हल्ला केला. बिबट्याने छबूबाई यांच्या चेहऱ्यावर पंजाने जोरदार प्रहार केला. बिबट्याने पत्नीवर हल्ला केल्याचे निदर्शनास येताच दिव्यांग असलेल्या एकनाथ राठोड यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता बिबट्यावर दगडांचा मारा केला. अचानक दगडांचा मारा झाल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली.

बिबट्याच्या हल्ल्यात छबूबाई गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमी छबूबाई यांना खरवंडी कासार येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे
कर्मचारी पिंजरा घेवून भगवानगड लमाण तांडा परिसरात दाखल झाले होते. यापूर्वी तालुक्‍याच्या पश्‍चिमेस असणाऱ्या मढी, शिरसाठवाडी, मोहरी, केळवंडी शिवारात यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात तीन बालकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यानंतर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात तीन आठवड्यांत तीन बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

तिसरा बिबट्या शिरसाठवाडी येथून दोन दिवसांपूर्वी पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला होता. पण आज पुन्हा तालुक्‍याच्या पूर्व भागात असणाऱ्या खरवंडी परिसरातील भगवानगड परिसरात पुन्हा बिबट्याने महिलेवर हल्ला केल्याने ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली आहेत. तसेच तालुक्‍यात नेमके किती बिबटे आहेत, असा प्रश्‍न उभा राहिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.