मुंबई – मिशन मंगल, हाऊसफुल, रुस्तम, पॅड मॅन, टॉयलेट एक प्रेम कथा आणि लक्ष्मी अश्या सुपरहिट आणि दर्जेदार चित्रपटांमधून सिनेरसिकांचे मनोरंजन करणारा बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच, अभिनेता ‘अक्षय कुमार’ लवकरच “बड़े मियां छोटे मियां’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय सोबत अभिनेता टायगर श्रॉफ देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. दरम्यान, या चित्रपटाबाबत आणि दोन्ही कलाकारांबाबत विविध गोष्टी दररोज समोर येत असतात.
अश्यातच एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटात मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या ‘श्रवण विश्वकर्मा’वर (वय 27) बिबट्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली असून, या घटनेमुळे सिनेमाच्या सेटवर एकच खळबळ उडाली आहे. कलाकारांमध्ये देखील भितीचे वातावरण पसरले आहे. ‘बड़े मियां छोटे मियां’चे शुटींग गोरेगाव चित्रनगरीत हेलीपॅड टेकडी परीसरात सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेकअपमन श्रवण विश्वकर्मा आपल्या मित्राला सोडायला बाईकवरून गेला होता होते. परत येत असताना त्यांच्या बाईकवर बिबट्याने अचानक हल्ला केला. यामुळे तो खाली कोसळला आणि बेशुद्ध झाला होता. त्याला आजूबाजूला उपस्थित असणाऱ्या लोकांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. प्रॉडक्शन हाऊसकडून त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. तसेच, आता श्रवणची प्रकृती ठीक असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.