पुणे (तळेगाव ढमढेरे) – रात्रीच्या सुमारास पत्नी आणि मुलांसह दुचाकीवरून घरी परतत असताना बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना पुणे ग्रामीणमधील तळेगाव ढमढेरे येथे समोर आली आहे. या हल्ल्यात चालत्या दुचाकीवरून चाललेल्या शेतकऱ्याच्या पत्नीसह मुलगा देखील जखमी झाला.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील शेतकरी नवनाथ नरके हे शिक्रापूर येथे पत्नी व दोन मुलांसोबत कामानिमित्त गेले होते.रात्री 10 च्या सुमारास काम संपवून शिक्रापूर कासारी फाटा मार्गे तळेगाव ढमढेरे येथील घरी परतत असताना. रस्त्याच्या कडेला शिकारीसाठी बसलेल्या बिबट्याने नरके यांच्या चालत्या दुचाकीवर हल्ला केला. ओसाड रस्त्याच्या कडेला हालचालीचा आवाज आल्याने नरके यांचे लक्ष बिबट्यावर गेले. यावेळी नरके यांनी गाडीचे स्पीड वाढवले त्यामुळे सुदैवाने बिबट्याची झडप अपुरी पडली.
नवनाथ नरके यांच्या पत्नी उर्मिला नरके यांच्या उजव्या पायाला व मुलगा विराज नरके यांच्या डाव्या पायाला बिबट्याच्या पंज्यानी दुखापत झाली.याबाबत या भागातील वनधिकारी यांना संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. यानंतर वन कर्मचारी यांना ग्रामस्थांच्यावतीने माहिती देण्यात आली.
याच महिन्यात या भागात राहणाऱ्या मेंढपाळ संतोष इंगळे यांच्या वाड्यावर दोनदा बिबट्यानी हल्ला करून तीन शेळ्या फस्त केल्या होत्या. वारंवार बिबट्याचे दर्शन येथील शेतकरी, ग्रामस्थांना होत आहे. याबाबत वारंवार वनविभागाला कळविले तरी कार्यवाही होत नसल्याने तसेच आत्ता त्याने मनुष्यवस्तीत येऊन मनुष्यावरच हल्ला केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अन्यथा वनविभागाच्या गलथान कारभारामुळे उद्या मोठी जीवितहानी देखील होऊ शकती अशी भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.