मंचर -सुलतानपूर (ता. आंबेगाव) येथील शेतकरी प्रदीप गंगाराम शिंदे यांच्या गोठ्यातील शेळीवर बिबट्याने हल्ला केला असून, तिचा फडशा पाडला. यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
घटनेचा पंचनामा मंचर येथील वनपाल एस. एन. भोसले, वनरक्षक आर. आर. मोमीन यांनी केला आहे. सुलतानपूर याठिकाणी उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहेतया परिसरात दिवसाही बिबट्याचे दर्शन होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
अवसरी बद्रुक परिसरात दहशत
अवसरी – टाव्हरेवाडी (अवसरी बुद्रुक, ता. आंबेगाव) येथे बिबट्याचा वावर वाढला आहे. परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना जीव मुठीत धरून शेतात जा-ये करावी लागत आहे. तरी वन विभागाने या भागात पिंजरा लावावा, अशी मागणी सरपंच उत्तम टाव्हरे यांनी केली आहे.
या पूर्वी अनेकवेळा शेतकरी, नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे त्यामुळे या परिसरातील नागरिक व शेतकरी भयभीत झाले आहेत.