बेल्हे -कोंबरवाडी (ता. जुन्नर) येथील कुंजीरमळ्यातील गोविंद कुंजीर (वय 52) या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 11) सकाळी साडेसा वाजण्याच्या सुमारास घडली.
गोविंद कुंजीर ऊसाच्या शेताला पाणी देत असताना पाणी वळवण्यासाठी ते खाली वाकले असता उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. बिबट्याच्या पंज्याने अंगातील शर्ट फाटले. त्यानंतर ते मागे वाळल्याने बिबट्याने पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात त्यांच्या हाताला पंजा लागला.
यावेळी त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकल्याने पुढील अनर्थ टळला. कुंजीर यांच्यावर बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. तर वनविभागाने या ठिकाणी तात्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी केली आहे.