मंचर – लौकी (ता. आंबेगाव) येथे मोटारसायकलवरुन जाणाऱ्या 29 वर्षीय प्रतीक तुकाराम थिटे यांच्यावर बिबट्याने जीवघेणा हल्ला करून जखमी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
चांडोली बुद्रुक येथुन मोटारसायकलवर लौकी येथील प्रतिक थिटे, निलेश थोरात, हरिष पडवळ हे तिघेजण शुक्रवारी (दि. 7) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास जात होते. त्यावेळी मोटारसायकल निलेश थोरात चालवत होते. त्यांच्या मागे हरिष पडवळ आणि प्रतिक थिटे बसले होते.
लौकीजवळील पाझरघाट येथे झाडामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने मोटारसायकलवरील मागच्या बाजूला बसलेले प्रतीक थिटे यांच्या डाव्या पायावर बिबट्याने हल्ला करून पंजाने ओरखडले. त्यानंतर मोटारसायकलचालक निलेश थोरात यांनी मोटारसायकल वेगाने चालवली तरीही बिबट्याने 50 मीटरपर्यत त्यांच्या मोटारसायकलचा पाठलाग केला.
समोरून मोटारसायकल आल्याने मोटारसायकलच्या उजेडाने बिबट्या दुसरीकडे निघून गेला. बिबट्याच्या हल्ल्यात प्रतीक थिटे हे जखमी झाले असून त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रतीक थिटे यांची भेट घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.