पणजी –गोव्याचा केवळ 14 वर्षांचा लियॉन मेंडोसा भारताचा सर्वात लहान वयाचा ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळपटू बनला आहे. 14 वर्षे 9 महिने व 17 दिवस इतके कमी वय असताना लियॉनने हा विक्रम साकार केला. लियॉन गोव्याचा दुसरा ग्रॅण्डमास्टर ठरला आहे. त्याच्या पूर्वी अनुराग म्हामल याने हा किताब पटकावला आहे.
इटलीत झालेल्या स्पर्धेत लियॉनने ग्रॅण्डमास्टर किताबाचा तिसरा व अखेरचा नॉर्म मिळवला. लियॉन भारताचा 67 वा ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळपटू ठरला आहे. तसेच यंदाच्या वर्षात हा किताब मिळवणारा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे.
यंदाच्या मोसमात चेन्नईच्या के. जी. आकाशने हा मान मिळवला होता. लियॉनने ग्रॅण्डमास्टरचा पहिला नॉर्म गेल्या ऑक्टोबरमध्ये प्राप्त केला होता. त्यानंतर बुडापेस्ट येथे झालेल्या स्पर्धेत त्याने दुसरा नॉर्म मिळवला होता. इटलीत झालेल्या स्पर्धेत त्याने तिसरा नॉर्मही प्राप्त करत ग्रॅण्डमास्टरचा किताब पटकावला.
करोनाचा धोका जगभरात पसरलेला असताना लियॉन आपल्या वडिलांसह युरोपमध्येच अडकून पडला होता. याच काळात हा धोका काहीसा कमी झाल्यावर काही स्पर्धा सुरू झाल्या व त्यात लियॉनने भाग घेत हे नॉर्म मिळवले.
लियॉनने यंदाच्या मार्च महिन्यापासून डिसेंबरपर्यंतच्या काळात एकूण 16 स्पर्धा खेळल्या असून त्यात त्याने 2452 गुणांमध्येही वाढ करताना एकूण एलो रेटिंग 2544 पर्यंत उंचावले व किताबावर शिक्कामोर्तब केले. आपल्या या यशाचे श्रेय लियॉनने आपले आई-वडील आणि प्रशिक्षक विशू प्रसन्ना तसेच आपल्याला आर्थिक सहकार्य करत असलेल्या संस्थांना दिले आहे.
आनंदकडून कौतुक
लियॉनच्या या यशाबद्दल भारताचा ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंद यानेही लियॉनचे अभिनंदन केले आहे. देशात तसेच परदेशातील विविध स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण खेळ केल्यामुळेच लियॉनला हे यश मिळाले असून येत्या काळात तो असेच यश सातत्याने मिळवेल, असा विश्वासही आनंदने व्यक्त केला आहे.