मुंबई – साऊथचा सुपरस्टार थलपथी विजय त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. विजयचे चाहते त्याच्या चित्रपटांची प्रतीक्षा करत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून विजय त्याच्या आगामी चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. तो लवकरच दिग्दर्शक लोकेश कनगराजसोबत त्याच्या पुढच्या चित्रपटात दिसणार आहे. यापूर्वी दिग्दर्शकाने या चित्रपटाच्या स्टारकास्टची घोषणा केली होती. आता या चित्रपटाचे नावही समोर आले असून नावासोबतच चित्रपटाचा टीझरही रिलीज करण्यात आला आहे.
चित्रपट दिग्दर्शक लोकेश यांनी थलपथी विजयच्या 67 व्या चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे. नावासोबतच निर्मात्यांनी धमाकेदार टीझरही शेअर केला आहे. लिओ असे या चित्रपटाचे नाव आहे. समोर आलेल्या टीझरमध्ये विजय चॉकलेट बनवताना दिसत आहे. पण त्याची शैली पूर्णपणे वेगळी आहे. टीझरमध्ये अशा प्रकारे दाखवण्यात आले आहे, यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे.
टीझरसोबतच निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेटही शेअर केली आहे. विजय 19 ऑक्टोबर 2023 रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर संपूर्ण स्टार कास्ट चित्रपटाच्या शूटिंगसाठी काश्मीरला रवाना झाली आहे. या चित्रपटात विजय व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेता संजय दत्त देखील दिसणार आहे. या चित्रपटात संजय दत्तची व्यक्तिरेखा खलनायकाची असणार असल्याचे मानले जात आहे. या दोन स्टार्सशिवाय प्रिया आनंद, तृष्णा कृष्णन आणि अर्जुन सर्जा हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
थलपथी विजय आणि त्रिशा कृष्णन १४ वर्षांनंतर एकत्र दिसणार आहेत. खूप दिवसांनी दोघांना पडद्यावर एकत्र पाहणे चाहत्यांसाठी खूप रोमांचक असणार आहे. हा चित्रपट पॅन इंडिया स्तरावर प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच हिंदी प्रेक्षकांनाही या चित्रपटाचा पुरेपूर आनंद घेता येणार आहे.