सुटीचे दिवस सोडून अर्ज भरता येणार; पितृपक्षानंतर उमेदवार अर्ज भरण्याची शक्यता
नगर – विधानसभा निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यातील बारा मतदारसंघासाठी अर्ज भरण्यास शुक्रवार दि.27 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे.मात्र सध्या पितृपंधरवडा सुरु असल्याने शनिवारनंतर उमेदवारी अर्ज भरले जाण्याची शक्यता आहे. शनिवारी अमावस्या व पितृपक्ष संपत असला तरी शनिवार,रविवारी सुट्टी असल्याने सोमवारपासूनच अर्ज भरले जाण्याची शक्यता आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर असून 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीची सुट्टी आहे. त्यामुळे सोमवार,मंगळवार,गुरुवार व शुक्रवार या चार दिवसातच सर्व जण अर्ज भरतील असा अंदाज आहे.
जिल्ह्यातील बारा मतदारसंघात त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी ही प्रक्रिया नियुक्त निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. अर्ज भरण्याचा व अर्ज विक्रीचा उद्या दि.27 पहिला दिवस आहे.मात्र पितृपंधरवड्यामुळे उद्या केवळ अर्ज विक्रीची शक्यता वर्तविली जात आहे. अर्ज उमेदवाराला संबंधीत निवडणूक कार्यालयात भरावा लागणार आहे. तो ऑफलाईन भरावा लागणार आहे. त्यानंतर निवडणूक कार्यालय तो ऑनलाईन भरून निवडणूक आयोगाला पाठविणार आहे.
अर्ज भरताना उमेदवाराला जे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे त्यात उमेदवाराचे नाव,स्वाक्षरी,गुन्हे दाखल असतील त्याची माहिती,केंद्र व राज्य शासनाचे तो भोगत असलेल्या लाभाची पदे आदी माहिती भरावी लागणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 4 ऑक्टोबर असून अर्जाची छाननी 5 ऑक्टोबरला होईल,तर अर्ज माघारीची मुदत 7 ऑक्टोबरपर्यत असेल. त्यानंतर उमेदवारांना प्रचाराला तेरा दिवस मिळणार असून 21 ऑक्टोबरला मतदान तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. या सर्व प्रक्रिया त्या-त्या तालुका पातळीवरील मतदारसंघाच्या कार्यालयात पार पडतील.
नामनिर्देशनपत्रे उमेदवाराला किंवा त्याच्या कोणत्याही सूचकाला निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत दाखल करता येणार आहेत. 216-अकोले (अ. ज.) विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांचेकडे तहसीलदार अकोले यांचे दालन येथे नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. 217-संगमनेर विधानसभा मतदारसंघासाठीची नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया उपविभागीय अधिकारी, संगननेर यांचे दालन, पहिला मजला, यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, नवीन नगर रोड येथे होईल. 218-शिर्डी मतदारसंघासाठी तहसीलदार राहाता यांचे दालन, तहसील कार्यालय, राहाता येथे नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. 219-कोपरगाव मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्रे तहसीलदार कोपरगाव यांचे दालन, नवीन प्रशासकीय इमारत, पंचायत समिती कार्यालयाजवळ कोपरगाव येथे दाखल करता येणार आहेत.
220-श्रीरामपूर (अनुसूचित जाती) विधानसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय (उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर यांचे दालन, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, श्रीरामपूर) येथे दाखल करता येतील. 221-नेवासा मतदारसंघासाठीची नामनिर्देशनपत्रे तहसीलदार, नेवासा यांचे दालन येथे दाखल करता येतील. 222-शेवगाव मतदारसंघाची नामनिर्देशनपत्रे तहसीलदार, शेवगाव यांचे दालन, नवीन प्रशासकीय इमारत. तहसील कार्यालय, शेवगाव, शासकीय आयटीआय जवळ,नगर रोड, शेवगाव येथे स्वीकारण्यात येतील. 223-राहुरी मतदारसंघासाठीची नामनिर्देशनपत्रे निवड़णूक निर्णय अधिकारी यांचे दालन, तहसील कार्यालय, राहूरी येथे दाखल करता येणार आहेत. 224-पारनेर विधानसभा मतदारसंघासाठीची नामनिर्देशनपत्रे निवडणूक निर्णय अधिकारी, यांचे कार्यालय, तहसील कार्यालय, पारनेर (मीटिंग हॉल) येथे स्वीकारली जातील.
225-अहमदनगर शहर मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालन, तहसील कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, अहमदनगर येथे तर 226-श्रीगोंदा मतदारसंघासाठी तहसीलदार, श्रीगोंदा यांचे दालन, तहसील कार्यालय, श्रीगोंदा येथे नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. 227-कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालन, जुने तहसील कार्यालय, बर्गेवाडी रोड, कर्जत येथे नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार आहेत.
प्रशिक्षणावर प्रशिक्षण
ही निवडणूक अचूक व सुलभ पार पडावी यासाठी संबंधीत यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना विविध प्रशिक्षणे दिली जात आहेत. त्यानुसार आज सर्वसाधारण प्रशिक्षण पार पडले.आता 28 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या काळात ईव्हीएम मशिन हाताळणी प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी बंगलोरचे प्रशिक्षक येणार आहेत.त्यानंतर 6,13 व 20 ऑक्टोबर असे तीन प्रशिक्षणे बुथनिहाय कर्मचाऱ्यांना दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेने दिली.
पक्षाच्या उमेदवाराला एक, तर अपक्षाला लागणार दहा सूचक
अर्ज भरताना जो मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचा उमेदवार असेल त्याला केवळ एक सूचक लागणार आहे.मात्र अपक्ष उमेदवाराला दहा सूचक लागणार आहेत. त्यामुळे प्रत्येक उमेदवार हे एकहून अधिक अर्ज भरतील कारण ज्यांना पक्षाचा एबी फ ॉर्म मिळणार नाही व त्याचा दहा सूचक असलेला अपक्ष अर्ज नसेल तर तो निवडणूक निर्णय प्रक्रियेतून बाद होवू शकतो. अर्जांची किंमत खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी दहा हजार तर राखीव प्रवर्गासाठी पाच हजार रूपये असणार आहे.