मुंबई – राज्यातील विधान परिषदेवरील राज्यपाल निर्देशित सदस्यांच्या 12 जागा रिकाम्या होत आहे. यात महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेसच्या वाट्याला 4 जागा येणार आहेत. कॉंग्रेस आपल्या राजकीय नेत्याला राज्यपाल निर्देशित उमेदवारी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कला, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रांतील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करू शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेत 12 सदस्य नियुक्त करण्याचे राज्यपालांना अधिकार आहेत. मंत्रिमंडळाकडून शिफारस करण्यात आलेली नावे राज्यपालांकडून स्वीकारली जातात. मात्र, सध्या राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध पाहता तिन्ही पक्षांनी शिफारस केलेल्या नेत्यांची वर्णी सहजासहजी लागणे दुरापास्त मानले जाते.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाने दोनदा शिफारस करूनही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल निर्देशित उमेदवार म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव प्रलंबित ठेवला होता. दोन रिक्त जागा भरण्यासाठी राष्ट्रवादीने केलेली शिफारस मंत्रिमंडळाकडून नसल्याचे कारण देत आणि सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी असल्याचे सांगत राज्यपालांनी नकार दिला होता.