नवी दिल्ली – भारताचे महान हॉकीपटू व 1964 साली टोकियो टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या हॉकी संघाचे कर्णधार चरणजीत सिंह यांचे गुरुवारी निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांना काही वर्षांपूर्वी पक्षाघाताचा झटका आला होता तेव्हापासून ते आजारीच होते.
22 नोव्हेंबर 1930 रोजी उना जिल्ह्यातील माईरी गावात चरणजीत यांचा जन्म झाला. डेहराडूनमधील कर्नल ब्राऊन केमब्रिज शाळेत त्यांचे शिक्षण झाले. 1960 सालच्या रोम ऑलिम्पिक स्पर्धेत रजतपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचा ते भाग होते.
पंजाब विद्यापिठातून त्यांचे पुढील शिक्षण झाले. चरणजीत सिंह यांच्या पत्नीचे 12 वर्षांपूर्वी निधन झाले. हॉकीतून निवृत्त झाल्यावर त्यांनी सिमला येथील हिमाचल प्रदेश युनिव्हर्सिटीच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक म्हणूनही काही काळ काम केले.