जुनी व्यवस्थादेखील सुरूच राहणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

वाराणसी – भारताची कृषी उत्पादने जगभर प्रसिद्ध आहेत. नवीन कृषी सुधारणांमुळे शेतकऱ्यांना नवीन पर्याय आणि नवीन कायदेशीर संरक्षण मिळाले असून कोणाला जुन्या व्यवस्थेत काम करायचे असल्यास जुनी व्यवस्थादेखील सुरूच राहणार आहे. पूर्वी मंडीबाहेरील व्यवहार बेकायदेशीर होते, परंतु आता छोटा शेतकरीदेखील बाजारपेठेबाहेरील व्यवहारांवर कायदेशीर कारवाई करू शकतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

वाराणसीमधील एनएच-19च्या वाराणसी-प्रयागराज भागातील सहा पदरी रस्ता रुंदीकरणाच्या प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्‌घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
मोदी म्हणाले, इतिहास जेव्हा फसवणुकीने भरलेला असतो, तेव्हा दोन गोष्टी स्वाभाविक असतात. पहिली गोष्ट म्हणजे, सरकारांच्या आश्वासनांबाबत शेतकऱ्यांना वाटणाऱ्या धास्तीमागे अनेक दशकांचा इतिहास आहे. दुसरे म्हणजे, ज्यांनी आधी आश्वासन देऊन ते मोडले होते तीच लोकं पूर्वी जे घडले होते ते आताही तसेच घडणार असा अपप्रचार करतात.

जेव्हा तुम्ही या सरकारच्या कामांचा मागील आलेख पाहता तेव्हा सत्य आपोआप बाहेर येईल. युरियाची काळाबाजारी रोखण्याचे आणि शेतकऱ्यांना पुरेसा युरिया उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन सरकारने दिले होते. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार किमतीपेक्षा दीडपट एमएसपी निश्‍चित करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. ही आश्वासने केवळ कागदावरच पूर्ण झालेली नाही, तर शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावरही पोहोचली आहेत.

विरोधकांवर टीका करताना मोदी म्हणाले, हे तेच लोक आहेत जे पंतप्रधान किसान सन्मान निधीविषयी प्रश्‍न उपस्थित करत आहेत आणि हे पैसे आगामी निवडणुकांवर लक्ष केंद्रित करून हे पैसे दिले जात आहेत आणि निवडणुकीनंतर हेच पैसे व्याजासह परत द्यावे लागतील अशी अफवा पसरवत आहेत. ज्या राज्यात विरोधी सरकार आहे अशा राज्यात त्यांच्या राजकीय स्वार्थ्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. देशातील 10 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांच्या बॅंक खात्यात थेट मदत जमा झाली असून आतापर्यंत सुमारे 1 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत.

केवळ आशंकांवर आधारित टीका
यापूर्वी सरकारच्या निर्णयांना विरोध होता पण आता होणारी टीका ही केवळ आशंकांवर आधारित आहे. अद्याप जे कधी घडलेच नाही त्याबद्दल समाजात संभ्रम पसरवला जात आहे, जो कधीही यशस्वी होणार नाही.

भूतकाळातील दुटप्पीपणाशिवाय बोलताना पंतप्रधान म्हणाले, एमएसपी जाहीर केली परंतु अत्यंत अल्प एमएसपी खरेदी चालू होती. ही फसवणूक वर्षानुवर्षे चालू होती. शेतकऱ्यांच्या नावे कर्जमाफीची मोठी पॅकेजेस जाहीर केली होती, परंतु अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यापर्यंत ती पोहोचलीच नाहीत, असे मोदी म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.