कायद्याचा सल्ला

आमची वडगाव मावळ याठिकाणी एक 29 गुंठ्यांची जमीन आहे. ही जमीन आम्हास वडिलोपार्जित मिळालेली आहे. या जमिनीच्या 7/12 वर आमची नावे लागलेली आहेत. तसेच ही जमीन आमच्या ताब्यात असून प्रत्यक्ष वहिवाटीत आहे. आमच्या कुटुंबात आम्ही तीन भाऊ व दोन बहिणी आहोत. एक महिन्यापूर्वी आम्ही कुठलाही व्यवहार न करण्याचा विचार केला होता; परंतु आमच्या येथील एका गुंड माणसाने आमच्या तीन भावांकडून “ही जागा विकायची आहे,’ या उद्देशाने आमच्याकडून एक खासगी साठेखत व कुलमुखत्यार बळजबरीने लिहून घेतले व आताही गुंड व्यक्ती आमच्या सर्व कुटुंबीयांकडून या जागेचे कमी किमतीत खरेदीखत करून मागत आहेत. तरी आता आम्ही याबाबत काय करावे?
आपली जमीन हडप करण्याच्या उद्देशाने एक गुंड व्यक्ती बेकायदेशीरपणे व जबरदस्तीने आपली जागा हडप करण्याचा प्रयत्न करीत आहे. तरी प्रथम याबाबत आपण तरी आपण राहात असलेल्या जवळील पोलीस स्टेशनमध्ये तोंडी तक्रार द्यावी. आपल्या तक्रारीतील पोलीस दखल घेतील व पोलीस याबाबत प्रथम माहिती अहवाल तयार करतील.

जर पोलिसांनी प्रथम माहिती अहवाल नोंदवला नाही तर आपण याबाबत लेखी तक्रार अर्ज पोलिसांना द्यावा. या लेखी तक्रारीची पोलीस दखल घेतील व त्याचप्रमाणे आपण या झालेल्या प्रकाराबाबत कुठल्याही वकिलाकडे जाऊन संबंधित गुंड व्यक्तीला नोटीस पाठवावी व या नोटीसमध्ये आपणाकडून करून घेतलेली करार व कुलमुखत्यार पत्र रद्द झाल्याबाबत कळवावे.

त्याचप्रमाणे या नोटीसमध्ये आपण या गुंड व्यक्तीस तिऱ्हाईत इसमाबरोबर व्यवहार करू नये, असे देखील कळवावे. आपण दिलेल्या नोटीस लांबच्या गुंड व्यक्‍तीकडून काय नोटीस उत्तर येते ते पाहावे. जर आपण केलेले आरोप नोटीस उत्तरात नाकारले तर तुम्हास मेहरबान न्यायालयात जाऊन दावा करून ती कागदपत्रे रद्द झाल्याचे ठरवून घ्यावे लागेल व आपणास अशाप्रकारे ठराव व निरंतर मनाईचा दावा करावा लागेल.

या प्रकरणांमध्ये ती गुंड व्यक्ती आपणास मारहाणीची धमकी देत असेल तर आपणास पोलीस खात्याकडून संरक्षण देखील मागता येईल आपण ही कारवाई म्हणजे तक्रार अर्ज लवकरात लवकर द्यावी. नाहीतर याबाबत आणखी काही समस्या उद्‌भवू शकतील.

आमचा हडपसर या ठिकाणी एक कारखाना आहे या कारखान्यात व्यवस्थापक म्हणून एक व्यक्‍ती कामास आहे. या व्यवस्थापकाच्या मुलीचे लग्न ठरले होते व या व्यवस्था हा प्रकार खासगी कर्ज झाले होते. यासाठी या व्यवस्थापकांनी त्याच्या मालकीची असलेली जमीन आम्हास रक्‍कम रुपये बारा लाखांत विकण्याचे मान्य व कबूल केले व प्रसार इतर साठेखत करण्याचे मान्य व कबूल केले आहे. त्याप्रमाणे आम्ही आमचे व्यवस्थापकास रक्‍कम रुपये दहा लाख वेळोवेळी दिले व ठरल्याप्रमाणे आम्ही या व्यवस्थापनाबरोबर साठेखताचा करार करून घेतला. घाईगडबडीने आम्हास हा साठेखताचा करार नोंदवता आला नाही तसेच उर्वरित रक्‍कम रुपये दोन लाख देऊन आम्ही या जागेचे खरेदीखत आमच्या व्यवस्थापनाकडून करून घेणार होतो; परंतु मुलीच्या लग्नानंतर या व्यवस्थापकाने आमच्याकडील नोकरी सोडून दिली व हा व्यवस्थापक त्यानंतर आम्हास या जागेचे खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ करू लागला. दरम्यानच्या काळात, जमिनीच्या किमती प्रचंड वाढल्या त्यामुळे हा व्यवस्थापक खरेदी खतासाठी जास्त रकमेची मागणी करू लागला आहे व त्यामुळे आम्ही या व्यवस्थापकास नोटीस पाठवली व खरेदीखत करून मागितले. त्या कामास नकार दिल्यामुळे आता पुढे काय करायचे?
आपला व्यवस्थापक आपणास फसवीत आहे व आपला विश्‍वासघात करत आहे, असे स्पष्ट होत आहे जरी आपण केलेले साठेखत नोंदवले नसले तरी आपण या व्यवस्थापकाच्या विरुद्ध खरेदीखत करून देण्याचा दावा मेहरबान न्यायालयात दाखल करून शकता. यास्तव यामध्ये आपले व्यवस्थापन आणि या जागेबाबत तिऱ्हाईत व्यक्तीबरोबर कुठलाही व्यवहार करू नये म्हणून निर्माण न्यायालयातून मनाई घ्यावी.

त्याचप्रमाणे आपण या दाव्यात मेहरबान न्यायालयाकडे अर्ज करून परवानगी घेऊन या साठेखताचा स्टॅम्प भरावा. जरी आपला साठेखताचा दस्त ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्‍ट या कायद्याप्रमाणे बरोबर नसला तरी विशिष्ट करार पूर्तीचा कायदाप्रमाणे चालवता येईल व आपणास मेहरबान न्यायालयातून आपला दावा जिंकता येईल. सदर दावा दाखल केल्यानंतर आपल्या व्यवस्थापकाने अन्य तिऱ्हाईत व्यक्तीबरोबर व्यवहार करू नये, यासाठी आपण या दाव्याची प्रत घेऊन मेहरबान निबंधक कार्यालयांमध्ये लीज पेंडन्सीचा दस्त करावा; म्हणजे त्या व्यवस्थापकाने जर इतर इसमाबरोबर व्यवहार केला तरी त्याचे दस्त नोंदवली जाणार नाही. अशा रीतीने आपल्या व्यवस्थापकांनी आपली फसवणूक केली म्हणून, आपण त्याच्याविरुद्ध इंडियन पिनल कोड कलम 406 आणि 420 प्रमाणे फौजदारी कारवाई करावी. आपणास या जमिनीचे खरेदीखत करून मागता येईल किंवा आपण व्यवस्थापकास दिलेली रक्‍कम नुकसान भरपाईसह मागता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.