कायद्याचा सल्ला

प्रश्‍न – मी एका सहकारी संस्थेचा सभासद आहे व मला संस्थेच्या कागदपत्रांची पाहणी व तपासणी करावयाची आहे, त्यासाठी मला काय करावे लागेल व मला कुठल्या कुठल्या कागदपत्रांच्या तपासणीचा अधिकार आहे व त्यासाठी मला किती फी भरावी लागेल?
उत्तर – महाराष्ट्र सहकारी कायदा कलम 32 प्रमाणे प्रत्येक सभासदास संस्थेच्या दप्तराची (रेकॉर्ड) तपासणी करून मागता येऊ शकते. सदर तपासणीसाठी कुठलीही फी आकारणी केली जात नाही. सभासदांना संस्थेचे खालील कागदपत्रे बघण्याचा व तपासण्याचा अधिकार आहे, ती कागदपत्रे खालीलप्रमाणे-
– महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 ची प्रत, महाराष्ट्र सहकारी कायदा नियमावली रूल्स 1961, संस्थेच्या पोट नियमाची प्रत, मागील वर्षाच्या ऑडिट झालेल्या हिशेबाचे उतारे, नफा तोटा पत्रक प कार्यकारिणीच्या सभासदांची यादी, सभासदांचे रजिस्टर, सभांचा इतिवृत्तांत, कार्यकारिणीच्या सभांचा इतिवृत्तांत, हिशेबाचे दप्तरातील ठरावीक व्यवहाराचे हिशेब लिहिलेला भाग

या कायद्यीाल कलम 38 प्रमाणे सभासदांचे रजिस्टर ठेवले जाते. सदर कागदपत्रांची तपासणी सभासद स्वतः वैयक्तिकपणे घेऊ शकतो अथवा ऍडव्होकेटतर्फे घेऊ शकतो. सभासदास फक्त वरीलप्रमाणे दप्तर तपासणीचा अधिकार असतो व सभासदास वाटल्यास या कागदपत्राच्या प्रती देखील घेता येतात. यासाठी सभासदास महाराष्ट्र सहकारी नियमावलीमधील नियम यादी क्रमांक 27 प्रमाणे निश्‍चित केलेले शुल्क भरावे लागते. सभासदाने योग्य ती आवश्‍यक फी भरल्यानंतर त्याला हव्या असलेल्या कागदपत्राच्या सही-शिक्‍क्‍याच्या नकला मिळू शकतात. अशारितीने आपण आपले संस्थेकडे अर्ज करून आपल्याला हव्या असलेल्या कागदपत्रांची तपासणी करावी व लागल्यास त्यासाठी आवश्‍यक असणारे शुल्क भरून सही शिक्‍याच्या नकला घ्याव्यात.

प्रश्‍न – मी एक विवाहित व्यक्ती असून मला तीन वर्षांची एक मुलगी आहे. माझी पहिले विवाहाची पत्नी दोन वर्षांपूर्वी अचानक आजारपणामुळे मयत झाली व त्यानंतर मी एक वर्षाने एका घटस्फोटित बाईबरोबर विवाह केला. सदर विवाह होण्यापूर्वी माझे दुसरे पत्नीने तिचा पहिल्या लग्नाचा काडीमोड झाल्याचे सांगितले व त्यामुळे मी व माझे घरच्यांनी तिच्यावर व तिच्या आई-वडिलांवर विश्‍वास ठेवून दुसरा विवाह केला; परंतु सदर लग्नानंतर जेमतेम सहा महिने माझी पत्नी माझेबरोबर माझे घरात राहिली; परंतु तिचा माझा कुठलाही वैवाहिक संबंध आला नाही व ती जेव्हा आमचे घरामध्ये राहात होती तेव्हा ती मला व माझे घरच्यांना सारखा मानसिक/शारीरिक त्रास देत होती व सतत तिचा मोबाइलवर कुणाशी तरी संपर्क/चॅटिंग इत्यादी करत असे. ती घरात कुठलेही काम करीत नव्हती व जर आम्ही तिला बोललो तर आमचेवर केस करून लटकवून टाकेन अशी धमकी देत होती. ती सुमारे दीड वर्षांपूर्वी आम्हाला काहीही न सांगता तिच्या वडिलांकडे तिच्या गावी पाली या ठिकाणी राहण्यास गेली व आता तिने माझे विरुद्ध कौटुंबिक हिंसाचार कायद्याप्रमाणे माझे व माझे घरातील लोकांचे विरुद्ध अर्ज केला आहे व दरमहा रु. 10,000/- ची मागणी केली आहे. माझा विवाह आळंदी या ठिकाणी झाला असून त्यावेळेस तिने तिचे खासगी काडीमोड झाल्याचे दस्त दिला आहे व ती आता तिचे पहिले पतीबरोबर संबंध ठेवून राहात आहे असे मला खात्रीलायकरीत्या समजले आहे. तरी परिस्थितीत काय करणे अपेक्षित आहे?
उत्तर – आपल्या प्रश्‍नावरून असे दिसते आहे की, आपली पत्नी हिने आपल्याबरोबर विवाह करून आपली घोर फसवणूक केली आहे, खोटे दस्तऐवज केले आहे व पहिले लग्न अस्तित्वात असताना आपल्याबरोबर दुसरे लग्न करण्याचा प्रकार केला आहे. वास्तविक पाहता आपला या स्त्रीबरोबर झालेला विवाह अवैध व निरर्थक आहे, कारण आता हिंदू विवाह कायद्याप्रमाणे आपले तथाकथीत पत्नीने तिचा पूर्वीचा लग्न मोडल्याचा काडीमोड दस्त हा कायद्याने बेकायदेशीर आहे, त्यामुळे तुमचा झालेला दुसरा विवाह हा कायद्याने अवैध व निरर्थक आहे. तुम्ही प्रथम तुमची दुसरी पत्नी, तिचे घरातील लोक व तिचा पहिला पती यांचेविरुद्ध इं.पि.को. कलम 34, 406, 420, 467 व 468 व हिंदू विवाह कायदा कलम 17 प्रमाणे मे. कोर्टामध्ये खासगी फिर्याद दाखल करावी व त्यानंतर आपला दुसरा विवाह निरर्थक व वैध ठरण्यासाठी मे. कौटुंबिक न्यायालयात अर्ज करावा, यानंतर आपण आपल्या विरुद्ध झालेल्या कौटुंबिक हिंसाचार कायद्याप्रमाणे आपली लेखी कैफियत/ म्हणणे दाखल करून हा अर्ज करण्यास आपली पत्नी पात्र नसल्याबाबतचे आपला बचाव मे. कोर्टामध्ये मांडावा म्हणजे मे. कोर्ट या केसमधील गुणदोषाचा विचार करून त्यावर योग्य तो कायदेशीर निर्णय देईल.

प्रश्‍न – आम्ही राहात असलेल्या इमारतीमध्ये 25 सदनिका आहेत, सदर इमारतीचे देखभालीसाठी व इतर बाबींसाठी आम्हाला सहकारी गृहरचना संस्था स्थापन करावयाची आहे. त्यासाठी आम्हाला काय करावे लागेल व त्यासाठी कुठली कुठली कागदपत्रे आवश्‍यक आहेत. त्याबद्दलची माहिती आम्हास द्यावी?
उत्तर – आपणास आपले इमारतीचे सदनिकाधारकांसाठी सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी मे. निबंधक, सहकारी संस्था यांचेकडे विहीत नमुन्यामध्ये अर्ज करावा लागेल, त्यापूर्वी आपण नियोजित संस्थेचे नाव मे. निबंधक यांचेकडून मंजूर करून घ्यावे लागेल. सदर नावास मंजुरी मिळाल्यानंतर आपण नियोजित संस्थेच्या नावाने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमध्ये खाते उघडून त्यामध्ये संस्थेतील सदनिका धारकांनी भरलेली सभासद फी व शेअरची रक्कम भरावी लागेल व त्यानंतर आपण वर सांगितल्याप्रमाणे मे. सह निबंधक सहकारी संस्था यांचेकडे अर्ज करावा व या अर्जासोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडावीत.

मिळकतीचा सिटी सर्व्हेचा अथवा 7/12 चा उतारा प बिल्डरने प्रत्येक सदनिकाधारकाबरोबर केलेल्या कराराची सत्यप्रत, इमारतीचा शोध अहवाल (टायटल सर्च रिपोर्ट), बांधकाम कमेन्समेंट व बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, इमारतीच्या मंजूर नकाशाची प्रत, प्रत्येक सदनिकेच्या क्षेत्रफळाबाबत वास्तुविशारद (आर्किटेक्‍ट) यांचा दाखला, बॅंकेत शिल्लक असल्याचा दाखला, सदनिकाधारकांना सभासद करून घेतलेल्या पावत्या, सरकारी फी भरल्याबात चलन व मुख्य प्रवर्तकाचे अंडरटेकिंग प प्लॉटचे क्षेत्रफळाबाबत, मुद्रांक फी भरल्याबाबत जाहीरनामा, संस्थेच्या स्कीमची माहिती, प्रमोटर्सची यादी, सदनिकेची किंमत व क्षेत्रफळासह, प्रमोटर्सची यादी, सदनिका विक्री व न विक्री झालेल्याची यादी, सभासदांकडून वर्गणी व भागापोटी घेतलेल्यांची यादी, उत्पन्न व खर्चाचा उतारा, संस्थेचे नाव निश्‍चित केल्याचे पत्र, वकील पत्र, ए फॉर्मच्या चार प्रति रु. 5/- चे कोर्ट फी स्टॅम्पसह, फॉर्म बी चार प्रति, फॉर्मच्या दोन प्रती प्रमोटर्सची यादीसह प हिरवे व पिवळे नियमावली चार प्रती, चालू भाडेकऱ्यांची यादी, दोन सदनिका असल्याबाबतचा जाहीरनामा, सभासदांचे अंडरटेकिंग, स्थानिक संस्थेचे ना हरकत पत्र

वरील प्रमाणे सर्व कागदपत्रे दाखल केल्यानंतर मे. निबंधक त्याची तपासणी करेल व त्यानंतर तुम्हाला तुमचे गृहरचना संस्था नोंद झाल्याचा दाखला देईल.

प्रश्‍न – मी एका शाळेमध्ये शिक्षक आहे व मी एक जोडधंदा चालू करण्यासाठी बॅंकेतून कर्ज घेऊन ट्रक विकत घेतला व व्यवसाय चालू केला. सदर ट्रक घेतल्यानंतर तो ट्रक ड्रायव्हरने पार्किंगमध्ये लावला होता. तो ट्रक मध्यरात्रीस कुठल्यातरी अनोळखी चोरट्याने चोरून नेला, मला याबाबतची माहिती सकाळी मिळाली म्हणून त्याबाबत मी रितसर फिर्याद पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. परंतु, त्यामध्ये पोलिसांनी तपास करून देखील माझा ट्रक व ट्रकचा चोर सापडला नाही. सदर ट्रकचा मी विमा घेतला होता व त्यामुळे मी याबाबतची माहिती विमा कंपनीस देऊन माझे ट्रकचे मिकतीची मागणी केली. परंतु विमा कंपनीने मी हलगर्जीपणामुळे ट्रकचे पार्किंग केले होते असे कारण सांगून माझी मागणी फेटाळली, तर मला विमा कंपनीचे विरुद्ध कुठे व कशी दाद मागता येईल?
उत्तर – आपण आपल्या प्रश्‍नामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण जर आपल्या मालकीचे ट्रकसाठी जर विमा उतरविला असेल तर त्या विमा कंपनीस आपली ट्रकची किंमत नुकसानभरपाई देणे आवश्‍यक आहे. आपली मागणी जर विमा कंपनीने फेटाळली असेल तर आपण ग्राहक मंचाकडे तक्रार अर्ज करावा व या अर्जामध्ये सर्व वस्तुस्थितीचे कथन करावे व या ट्रक खरेदीची ट्रक चोरीला गेल्याचा प्रथमदर्शी अहवाल (फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट) पंचनामा व इतर सर्व कागदपत्रे जोडावी, त्याचप्रमाणे या अर्जाचे प्रतिज्ञापत्र जोडावे. या अर्जानंतर ग्राहकमंच इन्शुरन्स कंपनीला नोटीस काढून याबाबत लेखी जबाब घेईल, त्यानंतर तुम्ही तुमचे व साक्षीदारांचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र मे. ग्राहक मंचामध्ये दाखल करावे, या पुराव्यामध्ये इन्शुरन्स कंपनीने वकिलांनी मागितली तर तुमचे व तुमचे साक्षीदारांची उलटतपासणी घेतली जाईल व त्यानंतर इन्शुरन्स कंपनी व त्यांचे साक्षीदारांचे प्रतिज्ञापत्र दाखल करेल. त्यावेळेस तुमचे वकील इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधीची व साक्षीदारांचे उलट तपासणी घेऊ शकतात. त्यानंतर मे. ग्राहक मंचाकडे तुमचे वकिलांचा व इन्शुरन्स कंपनीचे वकिलांचा युक्तिवाद होईल व त्यानंतर आपल्या अर्जाचा निकाल हा मे. ग्राहकमंच करेल. आपणास या केसमध्ये निश्‍चितपणे न्याय मिळेल व आपले ट्रकचे किमतीचे नुकसान भरपाई व्याजासह आपणास मिळेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

1 Comment
  1. नंदकिशोर नानोटे says

    सर मी माझी भाषी चे मग्न झाले मुलगा सर्व्हिस ला आहे पण तो संबंध करू शकत नाही
    वाशीम कोर्ट मध्ये तिची केस चालू आहे. पण मुलगा म्हणतो कि मी फारकती देत नाही. जसे माझं भविष्य खराब झालाय तसाच मी पण तुझं करणार. केस चालू होऊन 2वर्ष झालेत पण तो डिव्हास देत नाही. त्याच्यावर खावटी पण टाकली मंजूर झाली 1-2खावटी भरली आता तो खावटी पण भरत नाही. माझ्या माशीचे वय वाढत चाललंय. कोर्ट नुसते तारखा देत आहे… कृपया लवकर डीव्हास मिळण्या साठी काय करावं ते सुचवाल तर लय उपकार होतील… आम्ही लय भिडत चालली आहे लग्नाला 7-8लाख खर्च झाला पण आम्ही आता फार कंटालॊ आहे… तुमच्या पाया लागतो सर पण यावर उपाय चुचवा सर plz plz मि माझा मो नं 8806843346

Leave A Reply

Your email address will not be published.