कायद्याचा सल्ला

प्रश्‍न – माझी आई सोमवार पेठेतील राहत्या घरातून 2011 साली आमचे गावी यवत येथे जाते म्हणून गेली, अजून सापडली नाही. आम्ही लगेचच समर्थ पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रार दाखल केली. त्याचा दाखलाही पोलिसांनी दिलाय, मात्र यवत येथील घराची मोकळी जागा आईचे नावावर आहे. तेथील ग्रामपंचायत अधिकारी आईचे नाव कमी करून माझे नाव लावत नाहीत. कोर्टातून दाखला घेऊन या असे सांगतात. अशा वेळी मी काय करावे?
उत्तर – कायद्याने एखाद्या व्यक्तीचे अस्तीत्व 7 वर्षांसून दिसत नसेल तर ती व्यक्ती दिवाणी कायद्याप्रमाणे अस्तित्वात नाही अथवा तिचे दिवाणी निधन (Civil Death) झाले आहे असे गृहित धरण्यात येते व त्यासाठी तुम्हाला दिवाणी कोर्टात जाऊन, ती व्यक्ती नाहीशी झाली आहे याबाबत पुरावा देऊन त्याबाबत दाखला व हुकूम मिळवता येतो. तुमचेकडे तुमची आई नाहिशी झाल्याबाबत पोलिसांचा दाखला आहे. तुम्ही हा दाखला घेऊन कुठल्याही वकिलाकडे जावे व त्यांना सविस्तर तुमची आई नाहिशी झाली याबाबत माहिती द्यावी व त्याप्रमाणे मुद्दे दिलेने वकील याबाबत दिवाणी कोर्टामध्ये किरकोळ अर्ज दाखल करून तुमची आई अस्तित्वात नाही व तिचे दिवाणी निधन (Civil Death) झाले आहे असा दाखला व हुकूम मिळवून घेऊन तुमचे आईचे नावावर असलेली मिळकत तुमचे नावावर होण्यासाठी तुमचे गावाचे ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडे अर्ज व प्रतिज्ञापत्र व दाखला दाखल करावे म्हणजे तुमचे आईचे मिळकत तुमचे नावावर होईल.

प्रश्‍न – मी पूर्वी शुक्रवार पेठ येथे 1 खोलीमध्ये भाडेकरून म्हणून राहात होतो व घरमालकास वेळोवेळी भाडे देत होतो. मी राहत असलेली मिळकत जुनी असल्यामुळे ती पडावयास आली होती. परंतु ही मिळकत दुरूस्त करण्याकडे आमचा मालक मुद्दामून दुर्लक्ष करत होता. सन 2018 मध्ये घरमालकाने या मिळकतीबाबत पुणे महानगरपालिकेकडे तक्रार अर्ज करून ही मिळकत पाडण्यास कळविले. त्यावेळेस पुणे महानगरपालिकेन आम्हास ही मिळकत धोकादायक आहे असे कळविले. त्यानंतर आम्ही ही मिळकत आम्ही आमचे खर्चाने दुरूस्त करण्यास तयार आहोत असे पुणे म.न.पा.ला लेखी अर्जाने कळविले. परंतु, यासाठी आमचे घर मालकाने आम्हास संमती देण्याचे नाकारले व त्यानंतर पुणे म.न.पा.चे लोकांना आमचे घरमालकाने फूस दिली व त्यामुळे पुणे म.न.पा.ने आम्ही रहात असलेली मिळकत पूर्णपणे जमिनदोस्त केली व त्यामुळे नाईलाजाने आम्हाला दुसरीकडे जाऊन राहणे भाग पडले. आमचा घरमालक आता ही मिळकत बांधण्यास नकार देत आहे व आमचा आता या मिळकतीशी कुठलाही संबंध नाही असे म्हणत आहे तर आम्हास आमची भाड्याची जागा मिळण्यासाठी काय करावे लागेल?
उत्तर – कायद्याने जोपर्यंत कुठलाही भाडेकरू स्वतःहून त्यांचे भाड्याचे जागेचा ताबा घरमालकास देऊन ताबा पावती करून देत नाही किंवा जोपर्यंत घरमालक भाडेकरूला ताबा मिळण्यासाठी ते यातून भाड्याची जागा ताब्यात मिळण्यासाठी हुकूमनामा (Decree) मिळवत नाही तोपर्यंत भाडेकरूचे भाडेकरू म्हणून असलेले हक्क कायद्याने संपुष्टात येत नाही. अशारितीने या घरमालकाने मुद्दामहून तुमचे भाडेकरू म्हणून असलेले हक्क संपुष्टात आणण्यासाठी त्यांची मिळकत पाडली असेल तर त्याबाबत तुम्ही प्रथम घरमालकास कुठल्याही वकिलाकडून नोटीस द्यावी व त्यामध्ये तुमचेकडे असलेल्या खोलीइतके बांधकामाची जागा मागावी. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचे खोलीचे भाडे मनिऑर्ड़रने घरमालकास पाठवत राहावे. जर नोटीस देऊन देखील तुमचे घरमालकाने तुम्हास तुमची खोली देण्याबाबत कळविले नाही तर तुम्ही लघुवाद न्यायालयामध्ये जाऊन घरमालकाविरुद्ध रितसर दावा दाखल करावा. या दाव्यात निश्‍चितपणे तुम्हास तुमची भाड्याची जागा घेण्याचा हुकुमनामा मे. कोर्ट करेल.

प्रश्‍न – आमचे वडिलोपार्जित मिळकत असून या मिळकतीचे 7/12चे उताऱ्यावर आमचे चुलत भावाने मुद्दामून खोडसाळपणे आमची नावे वारस म्हणून नोंदविलेली नाहीत. फक्त त्यांचे घरातील लोकांची नावे वारस म्हणून नोंदवली आहेत व आता ही मिळकत आमचे चुलत भावाचे ताबेवहिवाटीस असल्याचा कायदा घेऊन आमचे चुलतभाऊ ही मिळकत तिऱ्हाईत व्यक्तींना विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहे. व त्याबाबत वर्तमानपत्रामध्ये जाहीर नोटीस दिली आहे. तर आम्ही या मिळकतीमध्ये आमचा वाटा मिळण्यासाठी काय करावे?
उत्तर – प्रथम आपण या जाहीर नोटीसला वकिलांमार्फत उत्तर पाठवून या मिळकतीचे जागेच्या विक्रीस हरकत पाठवावी. असा मिळकतींचे मालकीहक्क प्रस्तावित करण्याबाबत व वाटणी करण्याबाबत कायद्याने कुठलेही मुदतीची अडचण येत नाही म्हणून आपण या मिळकतीचे मालकीबाबत, वाटणीबाबत आपण दिवाणी कोर्टामध्ये दावा दाखल करावा. व या दाव्यामध्ये त्वरित अंतरिम मनाईचा अर्ज करून या मिळकतीचे व्यवहारास स्थगिती मिळावावी म्हणजे मे. न्यायालय आपणास ही मिळकत विक्री करू नये असा आपल्या चुलतभावाचे विरुद्ध मनाई हुकूम करेल.

प्रश्‍न – माझी गेले वर्षापासून 2 वर्षापासून परक्राम्य लेख अधिनियम प्रमाणे एका व्यक्तीविरुद्ध फिर्याद चालू आहे व या फिर्यादीमध्ये मला आरोपीने रक्कम रु. 6,00,000 चा धनादेश दिला होता व तो न वटता परत आला म्हणून फिर्याद चालू आहे. नुकतेच सरकारने या कायद्यात दुरुस्ती करून कलम 143 (अ) प्रमाणे या फिर्यादीमधील आरोपीकडून धनादेशच्या 20% इतकी रक्कम अंतरिम नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार दिला आहे. तरी माझे फिर्यादीचे कामी मी ही अंतरिम नुकसानभरपाई मागू शकतो का? याबाबत खुलासा करावा.
उत्तर – सरकारने परक्राम्य लेख अधिनियम कलम 143 अ प्रमाणे केलेल्या दुरूस्तीमुळे आता या कायद्यान्वये चालू असलेल्या व नवीन दाखल होणाऱ्या फिर्यादीस दिलासा मिळाला आहे. आपण देखील आपली फिर्यादीमध्ये वेगळा अर्ज करून आरोपीकडून धनादेशचे 20% रक्कम अंतरिम नुकसानभरपाई मागू शकता. या केसमध्ये आपल्या बाजूने निकाल लागल्यास ही रक्कम एकूण धनादेशाच्या रकमेतून वळती करून उर्वरित रक्कम आरोपीने आपणास द्यावी असा हुकूम मे. न्यायालय करेल. जर निकाल आपले विरुद्ध लागला तर आपणास ही रक्कम आरोपीस व्याजासकट परत करावी लागेल. आपल्या केससाठी त्या कायद्यातील दुरूस्ती अंतरिम नुकसान मागता येते असा निकाल नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.