कायद्याचा सल्ला

प्रश्‍न – मी पुण्यामध्ये रहात असून माझा व्यवसाय आहे. मला एका वित्तसंस्थेने मी कुठलाही त्यांचेकडे अर्ज न करता व कुठलेही कागदपत्रे दाखल न करता मला त्या कंपनीने त्यांचे क्रेडिट कार्ड पाठविले, व त्या कार्डाद्वारे त्यांनी मला रक्कम रु. 1,00,000/- पर्यंत वापरण्यासाठी अधिकार दिला. मला माझे व्यवसायाचे कामासाठी त्या क्रेडिट कार्डाचा उपयोग होईल या हेतूने मी ते कार्ड वापरण्यास सुरुवात केली व या कार्डचे वापरापोटी मी त्या कंपनीस दरमहा थोडे थोडे रकमेची परतफेड केली, त्यानंतर मला माझे आजारपणामुळे व माझ्या व्यवसायामध्ये आलेल्या तोट्यामुळे मी कार्डावर असलेली रक्कम कंपनीस देऊ शकलो नाही. म्हणून या कंपनीचे वसुली अधिकाऱ्याने मला फोन करून व माझे घरी येऊन मला व माझे कुटुंबियांस शिवीगाळ करून व मारहाणीची धमकी देऊन ही रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला खूप मानसिक व शारीरिक त्रास होत आहे. तर याबाबत मी काय करावे?
उत्तर – आपण सर्वप्रथम याबाबतचा तक्रार अर्ज तुम्ही रहात असलेल्या पोलीस स्टेशनला द्यावा व या अर्जामध्ये तुम्ही कंपनीचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक द्यावा. तसेच त्या कंपनीमधून तुमच्याकडे आलेल्या वसुली अधिकाऱ्यांची नावे व मोबाईल क्रमांक द्यावा. तसेच आपण या प्रकाराबाबत कुठल्याही वकिलांकडे जाऊन या कंपनीस रितसर कायदेशीर नोटीस पाठवून त्यांची तुमचेकडून वरील क्रेडिट कार्डासाठी घेतलेल्या कागदपत्रांची फाईल व हिशोबाचे स्टेटमेंट मागून घ्यावे व तुम्ही कंपनीचे क्रेडिट कार्डाची परतफेड कधी करणार याबाबत कळवावे व त्याप्रमाणे या नोटिसीमध्ये तुम्ही कंपनीस या क्रेडिट कार्डाचे रकमेची बेकायदेशीरपणे वसुली करू नये असे कळवावे. एवढे करून देखील जर त्या कंपनीने आपणास ही रक्कम वसूल करण्याकरिता त्रास चालू ठेवला तर तुम्हास या कंपनीविरुद्ध फौजदारी आणि दिवाणी कारवाई करता येईल.

प्रश्‍न – हिंदू विवाह कायदा व विशेष विवाह कायदा याप्रमाणे होणाऱ्या विवाहामध्ये काय फरक आहे?
उत्तर – आपल्या देशात अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार कुठल्याही पुरुषास ज्याचे वय 21 वर्षे पूर्ण आहे, त्यास कुठल्याही मुलीबरोबर जिचे वय 18 पूर्ण आहे तिच्याबरोबर विवाह करण्यास परवानगी आहे. विवाह हा ज्या त्या धर्मात असलेल्या रितीरिवाजानुसार होत असतो. जर एखाद्या व्यक्तीने हिंदू विवाह कायद्याप्रमाणे विवाह केला व विवाहाच्यावेळी मंगलअष्टका, सप्तपदी, होमहवन या धार्मिक गोष्टी केल्या तर तो विवाह हिंदू विवाह कायद्याप्रमाणे झाला आहे असे समजण्यात येईल, परंतु प्रत्येक विवाहाची नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यासाठी विवाहातील वधू-वरास विहीत नमुन्यामध्ये अर्ज करून त्यावर लग्न केलेल्या ब्राह्मणाची (पुरोहित) सही घेणे आवश्‍यक आहे. या विवाह नोंदणीचे अर्जासोबत वधूवरास त्यांचे ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, वयाचा पुरावा व लग्नाबाबत छापलेली पत्रिका व लग्नाचा फोटो जोडणे आवश्‍यक असते. या सर्व तरतुदी हिंदू विवाह कायदा व विवाह नोंदणी कायद्यामध्ये आहेत. परंतु, जर वधूवरांना वरील पद्धतीने लग्न न करता विवाह नोंदणी अधिकाऱ्यापुढे नोंदणी पद्धतीने लग्न करावयाचे असेल तर त्यांना लग्न करण्यापूर्वी नोंदणी अधिकाऱ्याकडे अर्ज व कागदपत्रे दाखल करावी लागतात. ही कागदपत्रे दिल्यानंतर त्या वधूवरास नोंदणी अधिकाऱ्याकडे लग्न करण्याची तारीख व वेळ दिली जाते. त्या तारखेस वधू-वरास साक्षीदार घेऊन विवाह नोंदणी अधिकाऱ्यासमोर हजर रहावे लागते. त्यावेळेस नोंदणी अधिकारी त्या वधू-वरांचे लग्नाची नोंद त्यांचेकडे असलेल्या रजिस्टरमध्ये घेऊन त्यावर वधू-वर व साक्षीदारांचे सह्या घेतो व त्यानंतर वधू-वर एकमेकांस हार घालून लग्न करू शकतात. ही विवाहाची पद्धत विशेष विवाह कायद्यामध्ये दिलेली आहे. वरील दोन्ही पद्धतीने केलेले विवाह कायद्याप्रमाणे ग्राह्य धरले जातात. विवाह करून ते जर नोंदविले नाही तर वधू-वरास भविष्यामध्ये वारसा हक्‍कासाठी, पासपोर्ट मिळविण्यासाठी व इतर कायदेशीर गोष्टींसाठी त्रास होऊ शकतो.

प्रश्‍न – आम्ही पुण्यातील एका जुन्या मिळकतीतील दोन खोल्यांमध्ये बरेच वर्षांपासून भाडेकरू म्हणू रहात आहे. वरील दोन खोल्यांची भाडेपावती आमचे मयत वडिलांचे नावाने होती. आमचे वडिलांचा मृत्यू सन 2012 मध्ये झाला. परंतु त्यानंतर आम्ही आमचे घर मालकांस भाडेपावतीवरील नाव बदलून भाडे घेण्यासाठी विनंती केली. परंतु आमचे घरमालक भाडेपावतीवरील नाव बदलण्यास व भाडे घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. तर याबाबतीत आम्ही काय करणे आवश्‍यक आहे?
उत्तर – मुंबई भाडे नियंत्रण कायद्याप्रमाणे तुमचे घर मालकाने भाडे घेणे व भाडेपावतीवर नाव बदलून देणे आवश्‍यक व बंधनकारक आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण सर्व प्रथम आपले घर मालकांस थकीत भाडे मनी ऑर्डरने पाठवावे, तसेच भाडेपावतीवरील नाव बदलण्याबाबत पत्र देऊन कळवावे, जर आपल्या घर मालकाने या दोन्ही गोष्टी केल्या नाही तर तुम्ही कुठल्याही वकिलांकडून तुमचे घर मालकास वरील गोष्टी करण्याबाबत नोटीस पाठवावी आणि मग एवढे करूनदेखील तुमच्या घर मालकाने भाडे घेण्यास व भाडेपावतीवर नाव बदलण्यास टाळाटाळ केली तर तुम्ही मे. लघुवाद न्यायालय यांचेकडे अर्ज करून याबाबत दाद मागावी.

Leave A Reply

Your email address will not be published.