कायद्याचा सल्ला

मी कोथरूड भागात व्यवस्थित गाडी चालवित होतो. त्यावेळेस मला वाहतूक पोलिसांनी थांबवले व माझ्याजवळील ड्रायव्हिंग लायसेन्स, आर.सी.टी.सी. बुक इ. कागदपत्रांची तपासणी केली. ती सर्व कागदपत्रे व्यवस्थित होती. तरी पोलिसांनी मी गाडी वेडीवाकडी चालवत होतो असा तोंडी आरोप केला. त्यास मी नकार दिला. त्यावेळेस पोलिसांनी माझे ड्रायव्हिंग लायसेन्स जप्त केले. त्यानंतर मला न्यायालयातून समन्स आले असून, त्यामध्ये मी इंडियन पिनल कोड 279 अन्वये गुन्हा केल्याचे दाखविले आहे. तरी याबाबतीत मला पुढे काय करावे लागेल?
उत्तर : आपण या केसमध्ये दिलेल्या तारखेस हजर रहावे व या केसमध्ये वकिलामार्फत जामीन घ्यावा. त्यानंतर तुम्हाला या केसमध्ये प्रत्येक तारखेस हजर रहावे लागेल. या केसमध्ये तुम्हाला दोषारोपपत्र (चार्जशीटची) कॉपी मिळेल. सदर फिर्याद तुम्हास तुमचे वकिलामार्फत गुणदोषावर चालवावी लागेल व त्यामध्ये तुम्ही दोषी नाही असे सिद्ध झाल्यावर तुमची या केसमधून सुटका होईल.

 मी दिनांक 25/01/2016 रोजी रिक्षा परमिटसह खरेदीचा करारनामा केला आहे व त्यापोटी लिहून देणार या स्त्रीस रक्‍कम रु. 2,00,000/- (रुपये दोन लाख फक्त) वेळोवेळी बॅंकेतून दिली आहे. अशा रितीने मी ठरवलेली सर्व रक्‍कम देऊन सुद्धा सदर लिहून देणार ही स्त्री मला ठरल्याप्रमाणे रिक्षा व परमिट देण्यास टाळाटाळ करीत आहे व माझी घेतलेली रक्‍कम मी मागण्यास गेलो असता मला शिवीगाळ करून मारहाणीची धमकी देत आहे. तरी याबाबतीत मला काय करावे लागेल?
उत्तर : आपल्याबरोबर झालेला प्रस्तुतचा व्यवहार हा पूर्णपणे कराराचा भंग व घोर फसवणुकीचा आहे. याबाबत आपण सविस्तर तक्रार अर्ज संबंधित पोलिसांकडे करावा व त्यांना फसवणूक करणाऱ्या स्त्री विरुद्ध इं.पि. कोड कलम 406, 409 व 420 प्रमाणे कारवाई करण्यास विनंती करावी. आपण या अर्जासोबत आपण केलेल्या कराराची प्रत व रक्‍कम रु. 2,00,000/- दिल्याचे पुरावे जोडावेत. याबाबतीत संबंधित पोलीस योग्य ती कायदेशीर कारवाई करतील.

 मी सन 2010 मध्ये श्रीराम चिट फंड यांचेकडून वैयक्तिक कर्ज घेतले होते व त्याच्या परतफेडीपोटी पुढील तारखेचे धनादेश दिले होते. सन 2018 मध्ये माझे काही धनादेश न वटता परत आले म्हणून सदर श्रीराम चिट फंड या कंपनीने माझेविरुद्ध परक्राम्य लेख अधिनियम (एन. आय ऍक्‍ट) कलम 138 अन्वये फिर्याद दाखल केली आहे. त्यानंतर मी या चिटफंडाचे सर्व थकबाकी भरलेली आहे व त्यांचेकडून कर्ज परतफेडीबात ना हरकत दाखला घेतला आहे. त्यानंतर मला माहे जानेवारी 2019 मध्ये वरील फिर्यादीचे समन्स आले आहे, याबाबत मी काय करावे?
उत्तर : आपण सर्वप्रथम श्रीराम चिट फंड यांचे ऑफिसमध्ये जावे व त्यांना तुमचेविरुद्ध चालू असलेली फिर्याद काढून घेण्यास विनंती करावी. जर फिर्यादी यांनी ही केस काढली नाही तर तुम्ही मे. कोर्टामध्ये हजर रहावे व फिर्याद काढून टाकण्याचा अर्ज करावा. या अर्जावर न्यायालय फिर्यादी यांना नोटीस काढून तुमचे अर्जावर जबाब घेईल व मग ही फिर्याद काढून टाकेल.

 माझे कॉलेजच्या आवारातून माझी लॅपटॉपची बॅग व त्यातील सामान म्हणजेच नवीन लॅपटॉप, मोबाईल, पाकिट व माझे कागदपत्रे चोरीला गेले होते व त्यानुसार मी पोलिसांकडे तक्रार केली आहे. सदर वस्तू चोरणारा चोर पोलिसांच्या मदतीने 3 दिवसात सापडला असून त्याच्याकडून माझ्या सर्व वस्तू मिळाल्या आहेत व या सर्व वस्तू पोलिसांचे ताब्यात आहे. मी या सर्व वस्तू पोलिसांकडे मागण्यास गेलो होतो. तेव्हा पोलिसांनीही मला कोर्टातून हुकूम आणा असे सांगितले, तर त्यासाठी मला काय करावे लागेल?
उत्तर : आपण सर्व प्रथम पोलिसांकडून सदर फिर्यादीची प्रथम अहवाल दाखला (ऋळीीीं खपषीोरींळेप ठशिीीं) ची प्रत घ्यावी व संबंधित कोर्टामध्ये क्रिमीनल प्रोसिजर कोड कलम 451 अन्वये अर्ज करावा व आपल्या जप्त वस्तूची मागणी करावी. या अर्जावर मे. कोर्ट सरकारी वकील व पोलीस तपासणी अधिकाऱ्याचे लेखी म्हणणे होईल. या अर्जासोबत वरील सर्व वस्तू तुमच्या मालकीच्या असल्याबाबतचे कागदोपत्री पुरावे द्यावे लागतील. त्यानंतर मे. न्यायालय बॉंड घेऊन तुम्हास या सर्व वस्तू पोलिसांकडून परत मिळण्याबाबत हुकूम करेल. सदर वस्तू तुम्हास वरील चोरीच्या खटल्यामध्ये पुरावा म्हणून न्यायालयासमोर आणाव्या लागतील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.