कायद्याचा सल्ला

माझ्या आईंचे बॅंक ऑफ महाराष्ट्र येथे बचत खाते होते व त्यांचे खात्यामध्ये रक्कम रु. 18,000/- इतकी शिल्लक होती. माझ्या आईचा मागील आठवड्यात मृत्यू झाला. माझे आईने या बॅंक खात्यासाठी कोणाचेही नाव नॉमिनी म्हणून लावलेले नव्हते. तरी सदर खात्यावरील रक्कम मला मिळण्यासाठी काय प्रक्रिया करावी लागेल?
सदरची रक्कम फारशी मोठी नसल्यामुळे तुम्हास मे. न्यायालयातून वारस दाखला घेण्याची आवश्‍यकता नाही. तुम्ही बॅंकेला रक्कम मिळण्यासाठी प्रतिज्ञापत्र, इतर वारसाचे संमतीपत्र व बॅंकेला इंडेन्मिटी बॉंड करून द्यावा व या रकमेची मागणी करावी. वरील कागदपत्रासोबत आपण आपला लेखी अर्ज व आईचा मृत्यू दाखला बॅंकेत सादर करावा म्हणजे आपणास बॅंक वरील रक्कम देईन.

माझे पती गेले 5 वर्षांपासून बेपत्ता आहेत. त्याबाबत मी पोलिसांकडे मिसिंगची तक्रार रितसर दिलेली आहे. परंतु अद्याप त्यांचा शोध लागत नाही. आता मला दुसरे लग्न करावयाचे आहे. तर मला त्यासाठी काय करावे लागेल?
एखादा माणूस बेपत्ता झाला असेल तर ती व्यक्ती हरवल्यापासून 7 वर्षांचे दिवाणी न्यायालयातून दाखला घ्यावा लागतो व या दाखल्यामुळे त्या व्यक्तीचे दिवाणी कायद्याप्रमाणे निधन झाले आहे, असा तो दाखला असतो. आपण पुढील दोन वर्षांनी असा अर्ज दिवाणी न्यायालयात करावा म्हणजे आपणास तुमचे पतीचा निधन झाल्याचा दाखला न्यायालयातून मिळेल व त्यानंतर आपण कायदेशीररित्या दुसरे लग्न करू शकाल.

मी माझ्या घरावर गहाणखत करून बॅंकेकडून कर्ज घेतले आहे. परंतु सदर कर्जाची परतफेड मी सध्या करू शकत नाही. याबाबत मला बॅंकेने नोटीस पाठवली आहे व कर्जाचे रक्कम पूर्णपणे भरा, असे मला कळविले आहे. तर मला सदरबाबत काय करावे लागेल?
आपण बॅंकेकडून आपले घर तारण ठेवून कर्ज घेतलेले आहे. बॅंकेमध्ये असणारी रक्कम ही समाजातील ठेवीदारांकडून घेतलेली असते व बॅंक या रकमेचे विश्‍वस्त असते. म्हणून तुम्ही घेतलेले कर्ज हे तुम्हास आज नाही तर उद्या परत द्यावेच लागणार आहे. आपण जर भविष्यात ही रक्कम बॅंकेत भरू शकत असाल तर आपण बॅंकेस लेखी अर्ज करून सदर रक्कम परतफेड करण्यासाठी मुदत, आपणास रिझर्व्ह बॅंकेच्या नियमाप्रमाणे मिळू शकते. परंतु आपण कर्ज परतफेड करू शकत नसालच, तर आपण बॅंकेस कळवून आपले घर बाजाराभावाप्रमाणे विकून टाकावे व या किमतीमधून बॅंकेच्या कर्जाची परतफेड करावी. आपण असे करण्यास टाळले तर बॅंक मे. कोर्टाकडून हुकूम घेऊन अथवा सिक्‍युरिटी ऍक्‍टप्रमाणे आपले घर जप्त करून विकून टाकेल व यामध्ये आपले आर्थिक नुकसान होईल. तरी आपण वर सांगितल्याप्रमाणे करावे आणि त्या मार्गाने आपले आर्थिक नुकसान टाळावे.

माझा पुण्यामध्ये चहा विक्रीचा व्यवसाय आहे व माझ्या या व्यवसायाच्या पुण्यामध्ये 25 पेक्षा जास्त शाखा आहेत. काही दिवसांपूर्वी “आम्ही चहामध्ये भेसळ करतो’, अशा बातम्या वृत्तपत्रामध्ये छापल्या गेल्या आहेत. त्याबाबत अन्न प्रशासन विभागाचा कोणताच अभिप्राय आलेला नाही. परंतु या बातम्यांमुळे माझ्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. तरी या बातम्यांबाबत मी काय कारवाई करू शकतो?
वृत्तपत्रामध्ये येणाऱ्या बातम्या या त्यांना मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर छापल्या गेल्या असतात. म्हणून आपण त्यांना दोषी धरू शकत नाही. परंतु, आपणास अन्नधान्य प्रशासनाकडून जर आपले चहाचे दर्जाबाबत अहवाल आला व त्यामध्ये भेसळ होत नाही असा शेरा आला, तर आपण अन्नधान्य प्रशासनास लेखी नोटीस पाठवावी व याबद्दल जाब विचारावा. आपल्या नोटीसीला उत्तर मिळाल्यानंतर आपण त्यांच्याविरुद्ध बदनामीची केस टाकून तुम्हास झालेल्या नुकसानीची भरपाई मागू शकाल. याबाबत आपण जाणकार वकिलांचा सल्ला घेऊन मगच पुढील कारवाई करावी. आपण याबाबत दिवाणी तसेच फौजदारी कायद्याप्रमाणे कारवाई करू शकता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.